विधानसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्याने महाविकास आघाडीतील इच्छुकांची धाकधूक वाढू लागली आहे. आपला मतदारसंघ मित्र पक्षाला सुटण्याचा धोकाही अनेकांना जाणवू लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप अशाच प्रामुख्याने लढती आजवर झाल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीमुळे जागा सोडायच्या झाल्यास तीन मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे. येथे 'सांगली पॅटर्न' होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर शहरातील दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावर उद्धव सेनेने दावा केला आहे. या मतदारसंघात सातत्याने काँग्रेस ( Congress ) लढत आली आहे. काँग्रेसचे दीनानाथ पडोळे तीनवेळा आमदार होते. गोविंदाराव वंजारी हेसुद्धा याच मतदारसंघातून निवडून आले होते. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला. ते पुन्हा लढायची तयारी करीत आहे. उद्धव सेनेला हा मतदारसंघ सोडल्यास मोठा असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघातही आजवर काँग्रेस लढत आली. युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. येथील विद्यमान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या जवळ आहेत. मात्र, त्यांनी अद्याप शिंदेसेनेत प्रवेश केलेला नाही. उद्धव सेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. काँग्रेसलासुद्धा हा मतदारसंघ लढायचा आहे. माजी अर्थ राज्यमंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक दहा वर्षांपासून या मतदारसंघात तयारी करीत आहे. उद्धव सेनेकडे विशाल बरबटे कामाला लागले आहेत. भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनीसुद्धा या मतदारसंघावरचा दावा सोडला नाही. भाजपने उमेदवारी नाकारल्यास ते बंडखोरी करीत असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीने उद्धव सेनेला रामटेक विधानसभा मतदारसंघ सोडल्यास काँग्रेसकडून 'सांगली पॅटर्न'चा अवलंब होण्याची शक्यता आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा सांगितला आहे. राज्याचे मात्री अर्थमंत्री डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार तयारीला लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) अनिल देशमुखांमुळे हा मतदारसंघ सहजासहजी सोडेल, असे दिसत नाही. हे बघता आघाडीतूनच बंडखोरी होईल असे सध्याचे चित्र आहे.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.