नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक वेगळीच शक्ती कार्यरत आहे, असे आज उघड झाले आहे. ही शक्ती कोणती याचा शोध सुरू झाला असला तरी याची मोठी झळ नाशिक जिल्ह्याला आणि मुख्यत्वे इंधन पुरवठ्याला बसली आहे. एका व्हायरल मेसेजमुळे (Whatsapp viral message) मनमाडमध्ये ट्रकचालकांनी (Transporters strike) संप सुरू केला आहे.
हिट अँण्ड रन (hit and run law) कायद्यातील प्रस्तावित तरतुदींना विरोध करण्यासाठी गेल्या आठवड्यात देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. अखेर केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला. त्यानंतरही ठिकठिकाणी ट्रकमालक आणि चालकांकडून संप पुकारण्यात येत आहे.
मनमाडच्या पानेवाडीमधून इंधन वाहतूक करणारे 900 ट्रक जागेवर उभे आहेत. व्हॉटसअॅपवर फिरणाऱ्या चुकीच्या मेसेजचा धसका चालकांनी घेतला असून, त्यातून हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात येतो आहे. असे असले तरी सकाळीच सुरू झालेल्या संपकऱ्यांकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पोहचलेले नाहीत.
नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शुक्रवारी (12 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील अधिकारी या कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतलेले आहेत. अशातच मंगळवारी व्हॉटसअॅपवर संपाचा पुकारा सुरू झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हिट अँण्ड रन कायद्याला विरोध करण्यासाठी तसेच संपासाठी एक पत्रही व्हायरल करण्यात आले. काही ठिकाणी तर ट्रकचालकांना संपासाठी दमदाटीही करण्यात आली. परिणामी मनमाडच्या पानेवाडीमधून नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याला होणारा इंधन पुरवठा बंद पडला.
याबाबत नाशिक जिल्हा पेट्रोल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले की, हा संप का आणि कसा सुरू झाला याचे कोडेच आहे. कोणत्याही अधिकृत संघटनेचा हा संप नाही. आमच्याकडे तीन दिवस पुरेल इतका इंधनसाठा आहे. मात्र, मागणी वाढल्यास तो एका दिवसातही संपू शकतो. प्रशासनाने त्वरीत हालचाली केल्या नाहीत तर अडचणी उद्भवतील, असे भोसले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संप अधिकृत नसताना चालकांवर संपासाठी दबाव कोणाचा येतो आहे, असा मुद्दाही यानिमित्ताने चर्चेला आला आहे. जिल्हाधिकारी याप्रकरणी कशी मध्यस्थी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपाबाबत ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनही संभ्रमात आहे. गैरसमज पसरवून काही चालकांकडून काम बंदची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प होत आहे. वास्तविक ऑल इंडिया ट्रान्सपोर्टशी चर्चेनंतर भारतीय न्याय संहिता 2023 लागू करण्यात येणार याबाबत सरकारने आश्वासन दिले आहे. त्यामुळे चालकांमध्ये हा कायदा लागू करण्याबाबतचा गैरसमज अथवा अफवा पसरवू नये असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केले आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.