
Manoj jarange Patil agitation: काही ओबीसी नेते मराठा आरक्षण आंदोलनावर राजकारण करीत आहेत. या नेत्यांना माजी आमदार वसंत गीते यांनी चांगलेच फटकारले आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात कोणताही वाद नसून सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधव शुक्रवारपासून आंदोलन करीत आहेत. यानिमित्ताने राज्यभरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. मराठा आरक्षण ही त्यांची प्रमुख मागणी आहे. याबाबत निर्णय घेणे आणि आंदोलकांचे समाधान करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारने हा निर्णय तातडीने घ्यावा. आंदोलन चिघळेल असे अजिबात होऊ देऊ नये, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते, माजी आमदार वसंत गीते यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे माजी आमदार गीते यांनी सांगितले. या मागणीबाबत ओबीसी घटकातील स्वयंघोषित नेते किंवा सध्या ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद निर्माण होईल असे प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना सरकारने तातडीने समज द्यावी. मराठा समाजाला जे काही आरक्षण दिले जाणार आहे त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत. हे आरक्षण कोणाच्याही वाट्यातून दुसऱ्याला देण्याचा प्रकार नाही. त्यामुळे विघ्नसंतोषी लोकांनी या विषयावर वातावरण कलूषीत करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा देखील गीते यांनी दिला.
सबंध महाराष्ट्रात सर्व समाजातील नागरिक गुण्या गोविंदाने नांदतात. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांच्यात कोणताही वाद नसतो. आम्ही सार्वजनिक जीवनात काम करताना गेली चाळीस वर्षे विविध समाजाशी असे संबंध टिकविले आहेत. सध्या मात्र काही विघ्न संतोषी लोक हे संबंध कसे दुरावतील यासाठी राजकीय हेतूने विधाने आणि इशारे देत आहेत. आरक्षणाचा प्रश्न हा शासनाच्या अखत्यारीतील आहे. शासनाला त्याचा निर्णय घेऊ द्यावा. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व जाती धर्माच्या कार्यकर्ते आणि नागरिकांमधील सौहार्दाचे संबंध बिघडविण्याचे काम कोणत्याही समाजकंटकांना करू देऊ नये. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सर्व समाजातील संबंध कायम सौहार्दाचेच राहतील त्यात बाधा येणार नाही.
राज्य शासनाकडून मराठा समाजाने आंदोलन सुरू केल्यावर विविध कारणे पुढे केली जात आहेत. जरांगे पाटील यांनी दोन महिने आधी आंदोलनाचे तारीख निश्चित केली होती. या कालावधीत सरकारने काय कार्यवाही केली? आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांच्याशी कोणती चर्चा केली? आंदोलक मुंबईत येतील त्याआधीच या प्रश्नाबाबत काही ठोस कृती का केली नाही? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत. राज्य सरकारने ठोस उपाययोजना करण्याऐवजी आंदोलकांची कोंडी करण्याचा प्रयत्न विविध घटकांच्या माध्यमातून केल्याचा आरोप होत आहे.
राज्य शासन, मुख्यमंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी या गंभीर प्रश्नावर विरोधकांची भूमिका काय? हे स्पष्ट होत नाही. त्या ऐवजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांसह विरोधी पक्षाच्या भूमिका काय असे विचारना सरकार करीत आहे. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आणि जबाबदारी पूर्णपणे मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनीच टाळाटाळ न करता हा निर्णय घेतला पाहिजे.
सध्या पावसापाण्याचे दिवस असल्याने हजारो मराठा समाजाचे नागरिक आणि महिला आझाद मैदानावर येऊन थांबले आहेत. सरकारने त्यांच्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध केलेली नाही हा गंभीर प्रकार आहे. परिसरातील चहा, वडापाव, उपहारगृह सर्वकाही पोलिसांनी दडपशाही करून बंद केले आहे. सरकारने असे पाऊल टाकणं योग्य नाही. हे धोरण तातडीने बदलून आंदोलकांना सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी ही माजी आमदार गीते यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.