
सिध्देश्वर मारटकर-
दि. 12 फेब्रुवारी रोजी सूर्य-कुंभ राशीत प्रवेश करीत असून, रवी-शनी युती लग्नेश बुधाबरोबर षष्टस्थानी होत आहे. याशिवाय अष्टमेश मंगळ दशमात आहे. या योगामुळे फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. रवी-शनी-बुध युतीमुळे दिल्लीच्या पक्षाला सत्ता सोडावी लागली आहे. या उलट चतुर्थेश गुरू भाग्यस्थानी असून, दशमातील मंगळामुळे विरोधी पक्ष भाजपला (BJP) मोठे यश मिळाले आहे. दशमातील मंगळामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी तरूण आणि आक्रमक नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता वाटते.
मात्र, याच योगामुळे मोठ्या राजकीय नेत्याला कारावास किंवा कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार आहे. मोठ्या नेत्याचा मृत्यू किंवा मोठ्या पदावरून बडतर्फी होण्याची शक्यता वाटते. मोठ्या पदावरील व्यक्तीच्या विरोधात बंड किंवा निदर्शने होतील. महत्त्वाच्या व्यक्तींचे अपघात किंवा घातपाताच्या घटना या काळात संभवतात. श्वसनाचे विकार किंवा संसर्गजन्य विकारांमध्ये मोठी वाढ झालेली दिसेल.
विशेषतः लहान मुलांना साथीच्या विकारांच मोठा त्रास संभवतो. निवडणुकीत गैरप्रकार घडल्याचे आरोप होतील. मोठे न्यायालयीन खटले गाजतील. न्यायालयीन निकाल अनपेक्षित आणि आश्चर्यकारक लागतील. या योगामुळे स्त्री किंवा कलाकारांवर कायदेशीर कारवाईची शक्यता राहील. भ्रष्टाचाराचे आरोप होतील. या योगामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या आत्महत्यांच्या घटना घडतील.
शुक्र-राहू-नेपच्यून योगामुळे मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींची प्रेमप्रकरणे, अनैतिक संबंध किंवा घटस्फोटासारख्या घटना गाजतील. न्यायालयीन खटल्यांमध्ये स्त्रीवर्गाला मोठा दिलासा मिळेल. चेंगराचेंगरीच्या घटना किंवा आगीच्या दुर्घटनांचा धोक संभवतो. या योगामुळे मोठी रेल्वे दुर्घटनेचाही धोका आहे.
पुणे-मुंबईत गुन्हेगारीत मोठी वाढ संभवते. या योगामुळे प्रमुख पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मोठे पक्ष फुटतील. पक्षांतराच्या घटना अनुभवास येतील. मुंबई, पुणेसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत कार्यकर्त्यांचे पक्षांतर मोठ्या प्रमाणात होईल. दिल्ली, पंजाब, हरियानामधील आम आदमी पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. या योगामुळे केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतील. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध निदर्शने होतील. विरोधी पक्ष आक्रमक होईल. अमेरिकेला वादळे आणि आग दुर्घटनांचा धोका संभवतो.
15 ते 21 फेब्रुवारी 2025
मेष ः हा काळ सरकारी कामे मार्गी लावण्यासाठी अनुकूल. राजकीय क्षेत्रात मनासारख्या गोष्टी घडतील. वरिष्ठांकडून मदत. शत्रूवर विजय, खटल्यांत यश. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत बदल-बदलीचे योग. मोठा लाभ.
वृषभ ः नोकरीत बढतीस अनुकूल काळ. वरिष्ठांची मर्जी राखा. परीक्षेत अडथळे. शेअरबाजारापासून दूर रहा. सर्दी-घसा विकार शक्य. हितशत्रूंपासून सावध रहा. जोडीदाराशी मतभेद शक्य.
मिथुन ः सभा-संमेलनात प्रसिद्धी, सामाजिक कार्यात यश. तीर्थयात्रा-प्रवास. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. घर-जागा खरेदी-विक्रीचे काम होईल. वरिष्ठांची काळजी घ्या. स्त्रीवर्गाकडून महत्त्वाची कामे. नोकरीत मनासारखे बदल. आरोग्य सांभाळा.
कर्क ः आर्थिक नुकसान शक्य सरकारी-कायदेशीर कामात त्रास. आरोग्याच्या तक्रारी. मोठी गुंतवणूक काळजीपूर्वक करा. भावंडे-नातलगांशी दुरावा. धार्मिक मंगलकार्य घडेल. तीर्थयात्रा-प्रवास योग. परीक्षेसाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतील.
सिंह ः या काळात कायदेशीर कटकटी. वैवाहिक जीवनात मतभेद शक्य. भागीदारी व्यवसायात तडजोड करावी लागेल.कौटुंबिक समस्यांवर मार्ग काढावा लागेल. उत्पन्नात घट होण्याची शक्यता. मात्र, वारसाहक्क-पेन्शनची कामे होतील. घर-जागाविक्रीतून आर्थिक लाभ. जुनी येणी वसूल होतील.
कन्या ः तरुणांसाठी नवीन नोकरीचे योग. मात्र, जबाबदारी, कष्ट वाढण्याची शक्यता. दगदग वाढेल. हतशत्रूंचा उपद्रव. एकटेपणा जाणवेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य.तरुणांचे विवाहयोग. आर्थिक कामे होतील. कर्ज मंजुरी. विद्यार्थ्यांना यश.
तूळ ः हा काळ मुलांची चिंता वाढवणारा. परीक्षाकाळ कठीण. शेअरबाजारात नुकसान होण्याची शक्यता. मोठ्या प्रवासाचे बेत रद्द कराल. कर्जाला विलंब. चुकीचे मित्र-व्यसनांपासून दूर रहा. नोकरीत अपेक्षित बदल. खेळ-स्पर्धेत यश. निवडणुकीत विजय मिळेल. वादविवादात सरशी.
वृश्चिक ः घर/वाहन/जागाखरेदीसाठी अनुकूल राहील. नोकरीत बढतीचे योग. वरिष्ठांकडून कौतुक शक्य. घराजवळ बदलीचे योग. मित्रांशी दुरावा शक्य. विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सोपी मात्र छोट्या चुकांमुळे नुकसान. शेअरबाजारात निर्णय चुकतील. मुलांसाठी खर्च. प्रवास जपून करा. आरोग्याची काळजी घ्यावी.
धनू ः सतत प्रवास करावे लागतील. कायदेशीर कामे/कागदपत्रे/करार होतील. नातलगांच्या गाठीभेटी. मान-सन्मान, पुरस्काराचे योग. सभा-संमेलन/कार्यक्रमात सहभाग. प्रसिद्धीचे योग. नोकरीत बदलाचे प्रयत्न होतील. राजकीय व्यक्तींना पद सोडावे लागेल. घरातील वातावरण आनंदी. पाहुण्याची वर्दळ वाढेल. नवीन वस्तू/वाहन/घरखरेदी. जोडीदाराशी मतभेद शक्य.
मकर ः मोठ्या आर्थिक उलाढाली शक्य. मोठी गुंतवणूक कराल. विमा/निवृत्तिवेतन मिळेल. वारसाहक्काची कामे होतील. कायदेशीर कामातून फायदा. परीक्षेत मोठे यश. नोकरीत-व्यवसायानिमित्त प्रवास. कलाकारांना प्रसिद्धी-पुरस्कार. हितशत्रूंवर विजय. नोकरीत बदल/बदली शक्य.
कुंभ ः कार्यक्षेत्रात अधिकार/पदोन्नती शक्य. तरुणांचा विवाहयोग. भागीदारी व्यवसायाची संधी. कोर्ट-कचेरीत अनुकूल निकाल. आनंददायक घटना. छोटे प्रवास/तीर्थयात्रा. मनोरंजन कार्यक्रमातून आनंद. नोकरी-व्यवसायासाठी त्रासदायक. मोठे बदल. विद्यार्थ्यांना अडथळ्यांची शर्यत.
मीन ः दूरच्या प्रवासाचे योग. परदेशगमन/व्हिसा/पारपत्राची कामे होतील. कर्जाची कामे होतील. कायदेशीर कामांसाठी मोठा खर्च. मात्र जोडीदाराशी गैरसमज. भागीदारीच्या व्यवसायात अडचणी. कलाकारांसाठी काळ उत्तम. अनाहुत पाहुण्यांचा पाहुणचार करावा लागेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.