
११ जून रोजी ज्येष्ठा नक्षत्रात होणारी पौर्णिमा राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठ्या नाट्यमय घटना घडविणारी राहील. दशमातील बुध-गुरू युतीमुळे या काळात राज-उद्धव ठाकरे, तसेच सुप्रिया सुळे-अजित पवार यांच्या युतीच्या किंवा एकत्र येण्याच्या बातम्या जोर धरतील. पण त्याचबरोबर केंद्रस्थानी शनी-नेपच्यून योग असल्यामुळे प्रत्यक्षात युती होण्यामध्ये बराच काळ गोंधळ चालू राहण्याची शक्यता वाढते.
या काळात अनेक अफवा, समज, गैरसमज अनुभवास येतील. स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होण्याची शक्यता असून, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होईल. फसवाफसवीचे राजकारण अनुभवास येईल.
शिवसेना स्थापना दिनाच्या पत्रिकेत मिथुन राशीत रवी, चंद्र, बुध, गुरू असे ग्रह असून, दशमस्थानी शनी आहे. दशमातील शनीमुळे कष्टकरी, कामगार वर्गासाठी लढा देणारा म्हणून या पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. १९९२नंतर राममंदिर (बाबरी मशीद) मुद्द्यावर भाजप बरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन १९९४ ते १९९९ सत्तेमध्ये सामील झाली. या काळात भाजप व शिवसेना यांची समसमान ताकद महाराष्ट्रात दिसून आली.
मात्र त्यानंतर भाजपने देशभर घोडदौड केली. तेव्हापासून भाजप-शिवसेनेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली व २०१४च्या निवडणुकीनंतर भाजपचा मुख्यमंत्री झाला. मात्र, योग्य वाटा सत्तेत न मिळाल्याची भावना उद्धव ठाकरे यांच्या मनात असल्याने २०१९ला विधानसभा निकालानंतर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रिकेतील गुरू-शनी योगामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी प्राप्त झाली.
कोरोना काळात मकर राशीतील शनीचे भ्रमण शिवसेनेच्या रवी राशीकडून अष्टमात सुरू झाले आणि ठाकरे सरकार कोसळले. पक्षातील नेत्यांना काँग्रेसबरोबर सत्तेमध्ये राहणे किंवा केंद्रातील भाजपबरोबर शत्रूत्व घेणे परवडणारे न वाटल्यामुळे पक्षात मोठी फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार स्थापन झाले.
दरम्यानच्या काळात लोकसभा-विधानसभा निवडणुकीपर्यंत शिवसेनेतील फूट सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी महापालिका निवडणुकीसाठी किमान मुंबई, नाशिक दोन प्रमुख शहरांसाठी ‘ठाकरे’ या समान नावावर राज ठाकरे यांना बरोबर घेतल्यास सत्ता मिळू शकते, या विचाराने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्र येण्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे.
ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या युतीचा विचार करता हे दोन्ही नेते एकत्र येणे व पुढे काम एकत्र काम करणे दोघांसाठी मोठे जिकिरीचे असणार आहे. याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांची सिंह रास असून, राज ठाकरे यांची मकर रास आहे. या दोन्ही राशी एकमेकांच्या शत्रू राशी (रवी- शनीच्या षडाष्टक) असल्यामुळे आतापर्यंत एकमेकांवर टीका करताना अनुभवास आले आहे. मात्र आदित्य-राज या काका-पुतण्यांची जोडी एकत्र काम करणे शक्य होऊ शकते.
मात्र, शिवसेनेच्या पत्रिकेत दशमात शनी असून, सध्या शनीचे भ्रमण पुन्हा त्याच ठिकाणी मीन राशीतून होत असून मूळ रवी-चंद्र गुरू वरून मिथुन राशीतील गुरूचे भ्रमण होत असल्यामुळे दोन भाऊ एकत्र प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचा उत्साह निश्चितपणे वाढण्याची शक्यता आहे; मात्र याचा परिणाम दोघांची ताकद वाढविण्यासाठी पोषक असला, तरी निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचता येईल का, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
मेष : सप्ताहाच्या सुरुवातीला व्यवसायात नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-मंगळ प्रतियोगामुळे मित्र-परिवारासोबत समज-गैरसमज संभवतात, मित्रांशी, सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत.
वृषभ : चंद्र-गुरू शुभ योगामुळे नोकरी व्यवसायात चांगले बदल होतील. व्यापारात मोठा लाभ होईल. मात्र वरिष्ठांशी मतभेद संभवतात. घरातील वातावरण गरम राहील. पैशाची कामे काळजीपूर्वक करावीत.
मिथुन : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-गुरू शुभयोगामुळे नावलौकीक मिळेल. विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रवेश मिळेल. चंद्र-मंगळ योगामुळे भावंडे, नातेवाइकांशी मतभेद संभवतात.
कर्क : सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-मंगळ योगामुळे कौटुंबिक वादविवाद संभवतात. बोलताना काळजी घ्यावी. मोठे खर्च होतील. उत्तरार्धात बदनामीपासून सावध राहावे.
सिंह : नोकरीमध्ये बदल-बदली होण्याची शक्यता राहील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मोठ्या पावसामुळे त्रास संभवतो. सर्दी, संसर्गजन्य विकार संभवतात.
कन्या : सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. गोंधळातून महत्त्वाची कामे होतील. चंद्र-गुरू शुभ योगामुळे नवीन नोकरी/व्यवसायाची संधी मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखण्यात यश मिळेल.
तूळ : घर-जागेसंदर्भातील कामे होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. चंद्र-गुरू योगामुळे मुलांच्या समस्या सुटतील. शेअर्ससारख्या व्यवसायात लाभ होईल.
वृश्चिक : सप्ताहाच्या सुरुवातीला भावंडे-नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. घर, जागा, वाहन खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. उत्तरार्धात शेअर, लॉटरीपासून नुकसान संभवते.
धनू : कौटुंबिक कामात वेळ जाईल. चंद्र-गुरू योगामुळे तरुणांचे विवाह जमतील. नातेवाईक-भावंडांचे सहकार्य उत्तम राहील. अपेक्षित निरोप किंवा पत्रव्यवहार होतील.
मकर : आरोग्याकडे लक्ष द्या. पैशाची कामे होतील. नोकरीमध्ये प्रमोशन, पगारवाढ होईल. नातेवाइकांमुळे मनस्ताप संभवतो. महत्त्वाच्या पत्रव्यवहार किंवा कायदेशीर कामात विलंब होईल.
कुंभ : कर्जाची कामे होतील. चंद्र-गुरू योगामुळे आरोग्य उत्तम राहील. मनस्थिती प्रसन्न राहील, मनासारख्या घटना होतील. मात्र उत्तरार्धात गुंतवणूक जपून करावी. पैशाची कमतरता भासेल.
मीन : मित्रांच्या गाठीभेटी होतील. परदेशगमनाची संधी मिळेल. व्हिसा-पासपोर्टची कामे होतील. हितशत्रूंवर विजय मिळवाल. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी. मोठ्या पावसामुळे त्रास संभवतो
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.