
विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून पोलिस दल एका नव्या संकटसत्रात अडकले आहे. पारंपरिक गुन्ह्यांप्रमाणेच (जसे की चोरी, खून, दरोडे) आता सायबर गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी आणि महिलांवरील गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेसमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. राजकीय हालचालींचं केंद्रबिंदू असलेल्या नागपूरमध्ये बंदोबस्ताच्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्या असून पोलिसांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. यामुळे 'खलनिग्रहणाय सद् रक्षणाय’ या ब्रीदवाक्याने कार्य करणाऱ्या पोलिस दलाला आता अधिक सुसज्ज आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज भासू लागली आहे.
राज्यातील गुन्हेगारी केवळ पारंपरिक स्वरूपात राहिलेली नसून ती आता अत्याधुनिक साधनांचा वापर करून केली जात आहे. सायबर चोरटे ATM फसवणूक, ऑनलाईन फ्रॉडसारख्या माध्यमातून लाखोंच्या रकमा उडवत आहेत. तर दुसरीकडे, अमली पदार्थांची तस्करी आणि युवापिढीवर त्याचा परिणाम हा सामाजिक आरोग्यासाठी गंभीर इशारा आहे. तसेच, मुलींचे अपहरण, बाललैंगिक अत्याचार अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस दलाचे मनोबल उंचावणे, त्यांना अत्याधुनिक साधनसामग्री पुरवणे, प्रशिक्षणाच्या नव्या पद्धती राबवणे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज ठरत आहे. नागपूरच्या सुरक्षिततेसाठी शासनाने विशेष लक्ष घालण्याची आणि पोलिस दलाची ताकद वाढवण्याची आवश्यकता आहे.
त्यातून समाजव्यवस्था चांगलीच ढवळून निघाल्याचे दिसून येते. त्यामुळे निश्चितच पोलिस यंत्रणेसमोर या समस्या आव्हान म्हणून समोर येत आहेत. काही काळापासून राज्यात संघटित गुन्हेगारी पोलिसांसमोर सर्वांत मोठे आव्हान ठरली आहे. एकूणच टोळ्यांमार्फत होणारी अमली पदार्थांची तस्करी, खंडणी, अपहरण, जुगार, जमीन माफिया, मानवी तस्करी यांसारखे गुन्हे घडवून आणले जातात. विदर्भात काही वर्षांमध्ये अनेक टोळ्या उदयास आलेल्या असून, त्यांच्या माध्यमातून जुगार, अवैध दारूची विक्री आणि खंडणी यांसारखे अवैध धंदे सुरू आहेत. याशिवाय, वाढती अमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्हेगारी ही पोलिसांची डोकेदुखी ठरलेली आहे.
राज्यातील तिसऱ्या प्रमुख शहरांपैकी एक आणि उपराजधानी असलेले नागपूर हे राज्याच्या गृहमंत्र्यांचे मूळ गाव आहे. मेट्रोपॉलिटन शहरांमध्ये समावेश असलेल्या या शहरात ‘नाइट लाइफ’चा प्रभावही अलीकडे वाढला आहे. मुंबई-पुण्यापाठोपाठ पब संस्कृती नागपूरात रुजल्याचे दिसून येते. त्यातून शहरात अमली पदार्थाची तस्करीही वाढली आहे. गेल्या चार वर्षांत शहरामध्ये किमान दहा ते बारा कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नागपूरात सातत्याने ‘एमडी’ची तस्करी वाढल्याचे दिसून येते. पोलिसांकडून सतत कारवाया होत असल्या तरी शहरात ‘एमडी’चे प्रमाण वाढत आहे. ‘एमडी’सह इतर अमली पदार्थाची तस्करी कमी होत नाही. नागपुरात शिक्षण आणि नोकरीसाठी आलेली तरुणाई अमली पदार्थाच्या विशेषतः ‘एमडी’च्या विळख्यात अधिक प्रमाणात गुंतत असल्याने शहरासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सातत्याने अभियान राबविले आहे. त्यात केलेल्या कारवाईत कुख्यात सुमीत चिंतलवार आणि फिरोज ऊर्फ अबू अजीज खान यांच्यासह अनेक कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे.
या गुन्हेगाराचे नेटवर्क आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या साथीदारांच्या माध्यमातून शहरात सर्रासपणे तस्करी केली जाते. पोलिस ठाणे आणि एनडीपीएस पथकांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, सातत्याने ‘एमडी’ आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीत यांच्या गॅंगमधील नावे येताना दिसतात. त्यातूनच शहरात नशेचा बाजार वाढला आहे. सुमीत चिंतलवारला काही महिन्यांपूर्वी शहराच्या सीमेवर ‘एमडी’सह अटक करण्यात आली होती. याशिवाय, अबू आणि भुरू यालाही ‘एमडी’च्या तस्करीमध्ये पोलिसांनी अटक केली. यातील काही गुन्हेगार अटकेत असले, तरी त्यांचे शहरात मोठे नेटवर्क आहे आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘एमडी’ची तस्करी केली जाते. शहर पोलिसांकडून त्यासाठी सातत्याने अभियान राबविण्यात येत असतानाही ‘एमडी’ आणि इतर अमली पदार्थांची वाढती तस्करी उपराजधानीतील पोलिसांसमोर एक आव्हान ठरले आहे.
विदर्भामध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाइल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे नागरिक सहजतेने सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. विशेषतः नागपूर, अमरावती, अकोला यांसारख्या शहरांमध्ये ओटीपीतून होणारी फसवणूक, बनावट लिंकद्वारे आर्थिक माहिती चोरणे, सोशल मीडिया हॅकिंग, तसेच ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली फसवणूक असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. दररोज किमान सात ते आठ गुन्हे सायबर पोलिसांकडे दाखल होताना दिसतात. याशिवाय, अलीकडच्या काळात ‘डिजिटल अरेस्ट’सारखा प्रकारही नागपूरमध्ये घडल्याचे दिसून आले.
युवा, महिला आणि सेवानिवृत्त अधिकारी आणि वृद्धांना सायबर चोरटे आपले भक्ष्य बनवताना दिसून येतात. गेल्या वर्षी राज्यभरात सायबर फसवणुकीच्या आठ हजार ९४७ प्रकरणांची नोंद करण्यात आली. त्यात नागपूरमध्ये २८२ प्रकरणात ६३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. शहरात त्यासाठी सायबर पोलिस ठाण्याची निर्मिती केली. मात्र, सायबर चोरट्यांचा वाढता हैदोस आणि त्यासाठी लागणारी पुरेशी यंत्रणा अद्यापही विदर्भ आणि नागपुरात उपलब्ध होताना दिसून येत नाही. सायबर गुन्हेगारीचे स्पेशल विंग सुरू असले तरी त्यात असलेल्या मनुष्यबळाची संख्याही तितकीच तोकडी आहे. त्यामुळे शहराचा व्याप बघता, सायबर सेलला पोलिसांची अतिरिक्त कुमक मिळणे गरजेचे आहे.
देशाच्या मध्यस्थानी असलेल्या नागपूरमध्ये हवाला आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पैशाची मोठी उलाढाल होताना दिसून येते. सोंटू ऊर्फ अनंत जैन याच्या प्रकरणात ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून पाचशे ते सातशे कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती समोर आली. याशिवाय अनेक व्यापारी या खेळात सोंटूच्या माध्यमातून कर्जबाजारी झाल्याचे दिसून आले. सातत्याने हवालाच्या माध्यमातून अनेकदा व्यवहार करण्यात येतात. त्यावर पोलिसांकडून कारवाई होते. मात्र, त्यानंतरही हवालाचे जाळे तितकेच मजबूत होताना दिसून येते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बंटी शाहू याच्या टोळीकडून कोटी रुपये हवालाच्या माध्यमातून दुबईत पाठविण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. मात्र, केवळ राजकीय दबावातून या कारवाईची सखोल चौकशी होत नाही, हे लक्षात आले आहे.
सायबर आणि अमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणांप्रमाणेच महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातही वाढ झालेली दिसून येते. पोलिसांच्या आकडेवारीनुसार वर्ष २०२४ मध्ये एकट्या नागपुरात ३०० पेक्षा अधिक महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, ‘पोक्सो’अंतर्गत असलेल्या गुन्ह्याच्या संख्येतही वाढ झालेली आहे. दररोज किमान तीन गुन्हे दाखल होतात. यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री आणि प्रेमप्रकरणातून होणारे अत्याचार, लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा सर्वाधिक समावेश आहे. नागपूरप्रमाणेच विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्येही अशा गुन्ह्याच्या नोंदी वाढल्या आहेत. दुसरीकडे अनैतिक मानवी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. शहरातून मागील १६ महिन्यांत शहरातून ७४८ मुले-मुली बेपत्ता झाले होते. मात्र, बेपत्ता मुलामुलींच्या शोधासाठी स्थापन केलेल्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तब्बल ७१३ जणांचा शोध घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातून अल्पवयीन मुला-मुलींच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे राज्यभरात पोलिस विभागाने मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची स्थापना केली आहे.
प्रेमप्रकरण, कौटुंबिक कलह, समाजमाध्यमांचा अतिवापर, प्रियकराकडून लग्नाचे आमिष, अनैतिक संबंध, घरात कुटुंबीयांकडून होणारा छळ, नोकरीचे आमिष, आर्थिक अडचण, तसेच चित्रपटात किंवा टीव्ही मालिकांमध्ये काम आणि मॉडेलिंग करण्यासाठी मुली घरातून पळ काढताना दिसून येतात. अशी परिस्थिती असतानाही महिला आणि मुलींच्या अपहरणात शहर पोलिसांना यश आले असून आजपर्यंत बेपत्ता झालेल्या ९८ टक्के महिला आणि मुलींना परत आणले आहे. त्यासाठी अनैतिक वाहतूकविरोधी पथकाची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली आहे. २०२४ मध्ये ३६७ शाळकरी मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी एचटीयू पथकाने तब्बल ३६४ मुलींचा राज्यासह अन्य राज्यांतही शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिल्या. याचवर्षी १८७ अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी १८६ मुलांना शोधून काढले. गेल्या वर्षी फक्त ३ मुली आणि एक मुलगा असे एकूण चारच जण बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यांत १०० मुलींनी घरातून पलायन केले. पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या पथकाने तब्बल ८१ मुलींचा शोध लावून पालकांच्या स्वाधीन केले. १९ मुलींचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. तसेच ३४ अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केले. त्या सर्व मुलांचा पोलिसांनी काही दिवसांतच शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.
नागपुरात घरफोड्यांची वाढती प्रकरणे ही एक मोठी समस्या ठरली आहे. दर महिन्याला नागपुरात २१ घरफोड्यांची नोंद होते. तर दररोज सरासरी तीन गुन्ह्यांची नोंद होते. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात ३२६ घरफोड्यांची पोलिसदफ्तरी नोंद आहे. त्यापैकी पोलिसांनी केवळ ६८ घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल केली तर त्यातील ११५ आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे, या चार महिन्यांत चोरट्यांनी जवळपास ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला आहे. त्यामुळे नागपूरकर यामुळे त्रस्त आहेत. त्यांना बाहेरगावी जाण्याचीही भीती वाटते. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिस सपेशल अयशस्वी ठरले आहेत. उपराजधानीत इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घरफोडीच्या प्रकरणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून खऱ्या अर्थाने ठोस पावलांची गरज आहे.
नागपूर शहर काही वर्षांपासून राजकीय घडामोडींचे केंद्र ठरले आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणून शहरात सातत्याने राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे काही वर्षांपासून शहर पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण वाढला आहे. दुसरीकडे विविध सण आणि उत्सवात बंदोबस्त यामुळे पोलिस सातत्याने बंदोबस्तात व्यस्त असतात. अशावेळी पोलिसिंगकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसून येते. याशिवाय पोलिस दलात असलेल्या कर्मचाऱ्यांची कमतरता मोठी समस्या आहे. त्यावरून इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण निर्माण होताना दिसून येतो.