Kolhapur News : कोल्हापुरात आरोप झाल्यानंतर तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले. तिथे ग्लोबल अवाॅर्ड विजेते रणजित डिसले गुरुजींच्या विरोधात गेले. त्यामुळे राज्यात लोहार गुरुजी चर्चेत राहिले. 31 ऑक्टोबर 2022 रोजी 25 हज़ार रुपयांची लाच घेताना लोहार सापडले अन् पुन्हा एकदा लोहार साहेबांची राज्यात चर्चा सुरू झाली. लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर लोहार यांना निलंबित करण्यात आले होते, पण हेच लोहार गुरुजी आता पुन्हा चर्चेत आलेत. ते म्हणजे त्यांच्याजवळ बेहिशेबी 5 कोटी 85 लाखांचे घबाड सापडले म्हणून, पण किरण लोहार नेमके कोण? कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना दबक्या आवाजात स्कॅमर अधिकारी का ? म्हटले जाते हेही वाचा.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील रहिवासी असणाऱ्या किरण लोहार यांनी डीएड होऊन करवीर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळवली, पण शिक्षक पेशावर स्वस्त बसतील ते लोहार कसले? प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या लोहार यांनी स्पर्धा परीक्षेत बाजी मारली. त्यानंतर लोहार रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रत्नागिरीत सेवा दिल्यानंतर ते थेट कोल्हापुरात प्रभारी शिक्षण उपसंचालकांच्या खुर्चीत जाऊन बसले. आणि इथूनच त्यांची वादग्रस्त कारकीर्द सुरू झाली. अनेकांची होत नसलेली कामे ही लोहार हे मध्यस्थी करून मार्गी लावत होते. दोघांचेही कल्याण हा शब्द वापरून समोरच्याला जाळ्यात ओढायचे. समोरचा आहे त्यांचे गुणगान गात बसायचे. अशाने अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित झाले. खाबुगिरीचे प्रमाण वाढल्यानंतर त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होत गेले.
त्यातून त्यांची ऑगस्ट 2017ला कोल्हापूर जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदावर बदली करण्यात आली. इथेही दोन वर्षे गेल्यानंतर लोहार यांचे पदाधिकाऱ्यांशीही खटके उडू लागले. न झालेली कामे जशी होऊ लागली तसतशी लोहार यांच्याबद्दलच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या. यातूनच मग जिल्हा परिषदेशी संबंधित अनेकांच्या अपेक्षा वाढल्या. आपलीही सर्व कामे झाली पाहिजेत, याचा आग्रह सुरू झाला. ती कामे होईनाशी झाली. त्यावरून स्थायी समितीपासून सर्वसाधारण सभेत लोहार 'टार्गेट" झाले. त्यावरून चौकशी लागली, त्यावरूनही ते 'न्यायालयात' गेले. पदाधिकारी, सदस्यांच्या नाकावर टिच्चून ते जिल्हा परिषदेत येत होते.
कोल्हापुरातून त्यांची थेट सोलापूर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून गच्छंती झाली. तिथेही त्यांचा स्वभाव बदलला नाही. संधीचे सोने करण्याचा लोहार यांचा स्वभाव त्यांच्या अंगलट आला. राज्यभर चर्चेंत आलेल्या ' ग्लोबल अवाॅर्ड विजेते रणजित डिसले गुरुजींना अंगावर घेतले, परिणाम म्हणजे त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यातच ते निलंबितही झाले; पण लागलेल्या चौकशीत त्यांच्याकडे 5 कोटी 85 लाखांची संपत्ती सापडली.
कोल्हापूरचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर सामाजिक शिक्षण संस्थाने त्या काळात पुरस्कारांचा अक्षरशः पाऊस पाडला. सार्वजनिक संस्थांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. या वेळी परदेशातील टोंगा विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेटही प्रदान करण्यात आली. परंतु लोहार यांना ही पदवी दिल्यानंतर कोल्हापूरच्या एका सजग नागरिकाने या विद्यापीठाची माहिती घेतली असता, ते विद्यापीठही बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.