Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे अखेर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अजित पवार यांची अध्यक्षपदी आणि संगीता कोकरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यानंतर आता अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते राज्यात उच्चांकी ऊस दर देणार का? कारखाना कार्यस्थळाचा कायापालट करणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पार पडलेली पंचवार्षिक निवडणूक सर्वार्थाने लक्षवेधी ठरली. माळेगाव कारखान्याचे यापूर्वीचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांच्या संचालक मंडळाने 5 वर्षात साखर निर्मितीबरोबर वीज, डिस्टलरी आदी प्रकल्पांच्या माध्यमातून सभासदांना सर्वाधिक ऊस दर दिला. गतवर्षी राज्यात सर्वाधिक प्रतिटन 3636, तर यंदा 3332 रुपये अॅडव्हान्स दिला. यापुढे अंतिम ऊस दर जाहीर होणार आहे. शैक्षणिक आणि आरोग्याच्या सेवा सुविधाही सभासदांना व त्यांच्या मुलांना पुरवल्या.
परंतु त्यांच्या कारभारात अनेक त्रुटी राहिल्याचे सांगत विरोधकांनी यंदा सत्ता परिवर्तन करण्यासाठी सभासदांना आवाहन केले होते. चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी खासगीकरण, कर्जबाजारीपणा, एकसारखी 2800 रुपये दिलेली पहिली उचल, भिजलेल्या साखरेमुळे झालेला तोटा, साखर विक्री प्रक्रियेत पारदर्शकता नसणे अशा मुद्द्यांवरती निवडणूक केंद्रीत केली होती. परंतु, त्याला पुराव्यासह सडेतोड उत्तर देत सत्ताधारी अजित पवार, आणि अॅड. केशवराव जगताप या नेते मंडळींनी विरोधकांचे मुद्दे खोडून काढले.
याच्या पुढे जात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार शुभारंभ सभेतच,'कारखान्याचा अध्यक्ष मीच होणार,' असे सांगून टाकले व सभासदांना आपलेसे केले. राज्यात उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवणार, कारखाना कार्यस्थळाचा कायापालट करणार, कारभारात शिस्त आणणार, अशी आश्वासनं पवार यांनी सभासदांना दिली होती. माळेगाव हा राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. उद्या सत्तेत आल्यानंतर याच्या वैभवात मी भरच घालणार हे सभासदांना पटवून दिले.
अजित पवार यांना सहकारातील आणि साखर उद्योगातील अनेक वर्षांचा अनुभव हे. त्यांच्या नेतृत्वातील जिल्हा बँक, कात्रज दूध संघ, बारामती दूध संघ, मार्केट कमिटी, सोमेश्वर कारखाना या संस्था उत्तम चालल्या आहेत, हे सभासदांना त्यांनी उदाहरणासह समजावून सांगितले. शिवाय 2014 ते 2019 वगळता अजित पवार मागील सातत्याने सत्तेत आहेत. ते सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी मदत मिळवून देऊ शकतात, हा मुद्दा विरोधक खोडून काढू शकले नाहीत.
यामुळे सहकाराचे बारकाईने ज्ञान असलेल्या दोन्ही तावरे यांनी अचूकपणे निवडणुकीची बांधणी करूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांनी निवडणुकीत उभी केलेली आव्हाने तोकडी पडली. परिणामी सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार निवडून आले. रंजन तावरेंसह इतर 20 उमेदवारांचा पराभव झाला. आता अजित पवार यांना प्रत्येक आरोप खोटा ठरवायचा आहे आणि प्रत्येक शब्द खरा करून दाखवायचा आहे. यात सरते शेवटी शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.