

Pune News : राज्यातील नगरपालिका व महापालिका निवडणुकीचा धुरळा आता बसला आहे. या दोन्ही निवडणुकीत भाजप व महायुतीला मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच आता आगामी काळात होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडीना वेग आला आहे. त्यातच आता मावळातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच त्यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी त्यांची साथ सोडत केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.
राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महायुतीमधील मित्रपक्षातच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार सुरु आहे. भाजपने (BJP) पहिला धक्का त्यांच्या महायुतीमधील मित्रपक्षाला दिला आहे. मावळमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे समर्थक आमदार सुनील शेळकेंना मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रशांत भागवत यांनी पत्नी मेघा भागवतांसोबत भाजपमध्ये प्रवेश करीत कमळ हाती घेतले आहे. भागवत यांच्या या प्रवेशाने जिल्हा परिषद इंदोरी-वराळे गटात यानिमित्ताने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून आलेल्या ‘आयात’ उमेदवाराला उमेदवारी देण्याचा घाट घातला जाणार आणि मेघा भागवत यांना डावलले जाणार ही शंका गृहीत धरून भागवत दाम्पत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली असल्याचे समजते. त्यामुळे आता या गटातील समीकरण बदलणार आहे.
दरम्यान, या प्रवेशाबाबत आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्याकडे विचारणा केली असता प्रशांत भागवत आज ही आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही, तुमच्याकडे राजीनामा आला असेल पण माझ्याकडे पोहोचलेला नाही, प्रशांत भागवत आजही दुपारपर्यंत माझ्याबरोबर होते. मात्र, आम्हाला राजीनामाबद्दल काही माहिती नाही, असे सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत तर काही जागा नव्याने मिळतील. महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना काही जागा सोडाव्या लागल्या, आम्हालाही ऐकावं लागेल, त्यांनाही ऐकावे लागेल, भाजपच्या मंडळींना देखील काही गोष्टी ऐकावे लागतील, आमच्या इच्छुक उमेदवारांना देखील ऐकावं लागेल, असे सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.