Pimpri Chinchwad : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील कथित फूट तथा बंडानंतर शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी सोमवारी (ता. १८) अजित पवारांच्या पिंपरी-चिंचवड या प्रिय शहरात जोरदार एन्ट्री मारली. या वेळी माजी उपमहापौर राष्ट्रवादीच्या विश्रांती पाडाळे, माजी सरचिटणीस शिरीष जाधव यांची घरवापसी झाली.
तर दुसरीकडे पुण्यात भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवक संजय नेवाळे यांनी अजित पवार राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेही अगोदर राष्ट्रवादीतच असल्याने त्यांचीही घरवापसी झाली.
दरम्यान, लांबलेली महापालिका निवडणूक, झालेले दोन राजकीय भूकंप यामुळे दीड वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये जोरात राष्ट्रवादीत सुरू झालेले जोरदार इन्कमिंग आणि भाजपमधून आउटगोइंग आता पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला आणखी वेग येणार आहे.
कारण अजित पवारांबरोबर गेलेले राष्ट्रवादीचे अनेक माजी नगरसेवक संपर्कात असून, त्यांची भविष्यात घरवापसी होऊ शकते, असे सूचक विधान रोहित पवार(Rohit Pawar) यांनी सोमवारी पिंपरीत केले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांच्या पंधरवड्यानंतर शहरात होणाऱ्या मेळाव्यात वा पुढील महिन्यातील शरद पवारांच्या सभेत हे इन्कमिंग होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, अजित पवार पुन्हा सत्तेत जाऊन पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांच्या पक्षात पुन्हा मोठ्या प्रमाणावर घरवापसी होण्याची (गत महापालिका निवडणुकीत २०१७ ला राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले) शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरीत शरद पवार राष्ट्रवादीत सोमवारी घरवापसी होत असताना तिक़डे पुण्यात ती झाली, पण अजित पवार गटात. या वेळी पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक विक्रांत लांडे, मयूर कलाटे, संजय वाबळे आदी उपस्थित होते.(Ajit Pawar)
गत टर्मला २०१७ ला भाजपकडून प्रभाग ११ मधून (चिखली) निवडून आलेल्या नेवाळेंनी पु्न्हा हातावर घड्याळ बांधले. ते पूर्वी राष्ट्रवादीतच होते. अजितदादांमुळे व त्यांच्यावरील प्रेमापोटी पुन्हा घरवापसी केल्याचे त्यांनी `सरकारनामा`ला सांगितले.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.