

ज्ञानेश्वर भोंडे-
Pune News: राज्यात महायुतीत एकत्र असले,तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे. एकमेकांवरील आरोप -प्रत्यारोपांनी दोन्ही बाजूनं कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी वाद पेटला असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनीही (Eknath Shinde) पुण्यात मोठं विधान केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता.9) पुण्यात व्यक्त केला. विधानसभेला घडवलेले परिवर्तन आता लाडक्या बहिणी महापालिकेतही घडवतील व यावेळी नक्कीच पुण्याचा कारभारी बदलतील,’’ असा विश्वास व्यक्त केला. तसेच जेथे– जेथे मी सभेला जातो, तेथे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात असंही त्यांनी म्हटलं.
कात्रजच्या सभेनंतर शिंदे यांनी पुण्यात नाना पेठेतील संत कबीर चौकात दुसरी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी मतदारांना पुण्याचा विकास करण्याच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन केले. शिंदे म्हणाले, ‘‘मी मुख्यमंत्री असताना राज्याला पुढे घेउन जाणारे विकासकामे केली व कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजना, महिलांना राज्य परिवहन बसमध्ये 50 टक्के सूट, मुलींना मोफत शिक्षण, युवकांना रोजगार आदी आहेत.
यावेळी शिवसेना (Shivsena) स्वबळावर लढत आहे. आपला अजेंडा हा पुण्याचा विकास व लोकांचे जीवनमान सुधारणे हा आहे. माझ्याकडे गृहनिर्माण विभाग आहे. शहरातील वाड्यांचा विकास, महाडातून सर्वसामान्यांना घरे द्यायची आहेत.’’ तुम्हाला पुणे गुन्हेगारीमुक्त, गुंडगिरीमुक्त, भ्रष्टाचारमुक्त पुणे हवे आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यासाठी महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकविण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत शिंदे म्हणाले, ‘‘पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात गुंडगिरी वाढली आहे. भानगिरेंच्या गाडीवर काहींनी भ्याड हल्ला केला व पळून गेले. हिंमत असे तर समोर येऊन लढाई करा. शिवसैनिक काम करून दंगा करतात.
कोविड, महापूर, आपत्तीत लोकांना मदत करतात. मी याआधी अनेक ऑपरेशन केले आहेत. कोणाची सर्जरी करायची व कोणाला गोळी द्यायची हे चांगले माहीत आहे. शिवसेना महापालिका निवडणुकीत किंगमेकर ठरेल. त्यासाठी महापालिकेवर भगवा फडकवा’’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
येत्या 15 तारखेला मतदान नव्हे तर तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याचा फैसला करणारा निर्णय आहे. मी पुण्यातून फिरत असताना लोकांच्या मनात परिवर्तन घडवण्याबाबतचा कौल जाणवत आहे,असंही शिंदे यांनी सांगितलं. नाना पेठेतील शिवसेनेच्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे 60 उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेचा जाहीरनाम्याचे वाचन केले तर सामंत यांनी वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. तर शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातून गुन्हेगारी, पब संस्कृती बंद करण्याचा मानस व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.