
Baramati, 25 June : बारामती तालुक्यातील सहकार क्षेत्रातील गुरु-शिष्य समजले जाणारे चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे जोडीला धोबीपछाड देत माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा एकहाती वर्चस्व मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये ऊस उत्पादक मतदारसंघाच्या माळेगाव गटातील रंजन तावरे यांना धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले आहे. अजित पवार यांनी करुन दाखविले...या शब्दांत भावना व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची (Malegaon Sugar Factory) मतमोजणी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. मंगळवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी बुधवारी दुपारनंतरही सुरूच होती. दुपारी दोनपर्यंत जाहीर झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सर्व जागांवर अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरीत उमेदवारही माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता आघाडीवर आहे. त्यामुळे अजित पवार यांचा पॅनेल १९ ते २० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पॅनेलचा विजय निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय भवनासमोर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. माळेगाव कारखान्याच्या भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनेलचे विलास ऋषीकांत देवकाते 2194 मतांनी विजयी झाले. विलास देवकाते यांना 8972 तर विरोधी सहकार बचाव पॅनेलचे सूर्याजी देवकाते यांना 6598 मते मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे ब वर्गातून ८१ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ९१ मते मिळाली आहेत, तर विरोधी भालचंद्र देवकाते यांना १० मते मिळाली आहेत.
इतर मागासप्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनेलचे नितीन वामनराव शेंडे 1153 मतांनी विजयी झाले. त्यांना 8494 तर सहकार बचाव पॅनेलचे रामचंद्र नाळे यांना 7341 मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील नीलकंठेश्वर पॅनेलचे रतनकुमार भोसले हे 1487 मतांनी विजयी झाले. त्यांनी सहकार बचाव पॅनेलच्या बापूराव गायकवाड यांचा पराभव केला. भोसले यांना 8670 तर गायकवाड यांना 7183 मते मिळाली.
महिला राखीव प्रवर्गातून नीलकंठेश्वर पॅनेलच्या संगीता कोकरे आणि ज्योती मुलमुले यांनी सहकार बचाव पॅनेलच्या राजश्री कोकरे आणि सुमन गावडे यांचा पराभव केला आहे. संगीता कोकरे यांना 8440 तर ज्योती मुलमुले यांना 7576 तर राजश्री कोकरे यांना 7485 व सुमन गावडे यांना 6099 मते मिळाली आहेत.
ऊस उत्पादक मतदारसंघाच्या माळेगाव गटात धक्कादायक निकाल लागला आहे. हा गट पारंपारिकदृष्ट्या तावरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र या गटातून तीनही उमेदवार अजित पवार गटाचे निवडून आले आहेत. या गटातून कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विरोधकांचे नेते रंजन तावरे यांचा पराभव झाला आहे. हा पराभव तावरे कंपनीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माळेगाव गटातून नीलकंठेश्वर पॅनेलचे शिवराज जाधवराव यांना 8612, बाळासाहेब तावरे यांना 7946 तर राजेंद्र बुरुंगले यांना 8116 मते मिळाली. रंजन तावरे यांना 7353, संग्राम काटे यांना 6701 तर रमेश गोफणे यांना 6302 मते मिळाली. यंदा रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुपारी दोनपर्यत एक-दोन जागांचा अपवाद वगळता अजितदादांचे नीलकंठेश्वर पॅनेलचे उमेदवार आघाडीवर होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्याकडे पाहून तुम्ही मतदान करा. राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमधील भाव तुम्हाला देतो, असा शब्द दिला होता. तसेच पाच वर्षे मीच कारखान्याचा अध्यक्ष राहीन, असेही म्हटले होते. अजित पवार यांच्या त्या आवाहनाला सभासदांनी भरभरून साथ देत नीलकंठेश्वर पॅनेलला निर्विवाद बहुमत मिळवून दिले आहे, या मुळे माळेगाव कारखान्याचे नवे अध्यक्ष अजित पवार हेच असणार हे आता स्पष्ट झाले आहे.
अजित पवार यांनी एकहाती निवडणूक लढवून दिग्गज समजल्या जाणाऱ्या चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे जोडीला पराभवाची धूळ चारली आहे. अजित पवारांन तब्बल आठवडाभर बारामतीत थांबून वाडीवस्तीवर जात प्रचार करत नाराजी दूर करुन माळेगावची सत्ता अक्षरशः खेचून आणली आहे. अजित पवारांचाच शब्द आजही बारामतीत चालतो, हे विजयातून स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.