Dispute In Mahavikas Aghadi : महाआघाडीच्या ऐक्यात मिठाचा खडा; कोल्हेंनी ‘ते’ विधान करताच शिवसेना नेते संतापले!

Shirur Lok sabha Electon 2024 : खासदार कोल्हे यांनी निकम यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख केला आणि त्याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली.
Shiv Sainik
Shiv SainikSarkarnama

Manchar, 11 June : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आणले. मात्र, डॉ. कोल्हे यांच्या एका विधानामुळे आघाडीच्या ऐकीत मिठाचा खडा पडला असून शिवसैनिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

शिरूरचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe ) यांचा मंगळवारी (ता. 11 जून) मंचर येथे नागरी सत्कार करण्यात आला. त्या सत्कार समारंभात बोलताना डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम ( Devdutt Nikam) यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख करताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावरून खाली उतरत जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे कोल्हे यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.

लोकसभा मतदारसंघातील विजयाबद्दल डॉ. अमोल कोल्हे यांची आज मंचर शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर झालेल्या जाहीर सत्कार समारंभात हे राजकीय नाराजीनाट्य घडले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावेत. त्यात आंबेगाव मतदारसंघाचा समावेश असावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर आणि शिवसेनेचे संघटक राजाराम बाणखेले यांनी केली.

देवदत्त निकम यांनी 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे उत्कृष्ट नियोजन केले, त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे, असे असे कौतुक करत असतानाच खासदार कोल्हे यांनी निकम यांचा ‘भावी आमदार’ असा उल्लेख केला आणि त्याच ठिकाणी वादाची ठिणगी पडली.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, संघटक राजाराम बाणखेले, दत्ता गांजाळे, दिलीप पवळे, सुरेखा निघोट यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांनी त्याच ठिकाणी घोषणाबाजी सुरू केली. व्यासपीठाशेजारीच हा गोंधळ सुरू असल्यामुळे डॉ. कोल्हे यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे हे शिवसैनिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, शिवसैनिकांच्या भावना संतप्त होत्या. स्वतः कोल्हेंनीही शिवसैनिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाच शिवसैनिकांनी सवाल केला.

Shiv Sainik
Indapur Politics : हर्षवर्धन पाटील, यशवंत मानेंच्या गावांत सुळेंना, तर भरणेंच्या गावांत सुनेत्रा पवारांना आघाडी

आम्ही विरोधकांचे वार छातीवर झेलले : बाणखेले

लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही कोल्हे यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले. विरोधकांचे वार आम्ही आमच्या छातीवर झेलले आहेत. असे असताना विधानसभेच्या जागेचा फार्म्युला जाहीर होण्याच्या अगोदरच निकम यांची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोल्हे यांना कोणी दिला, असा सवाल बाणखेले यांनी केला.

प्रचारादरम्यान अनेकदा आमचा अपमान : सुरेश भोर

जिल्हाप्रमुख सुरेश भोर म्हणाले, मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, माझ्यासह सर्व शिवसैनिकांनी कोल्हे यांच्यासाठी रात्रंदिवस काम केले आहे. प्रचारादरम्यान शिवसैनिकांचा अनेकदा अपमान झाला आहे. मतमोजणीच्या वेळी कोल्हे यांचा पास देणे आवश्यकत असताना मला एका अपक्ष उमेदवाराचा पास दिला. तो माझ्या पदाचा अवमान होता, त्यामुळे मी मतमोजणीला थांबलो नाही. पण, माझ्याविषयी बदनामी करण्याचा प्रयत्न देवदत्त निकम यांनी केला, तो यापुढे आम्ही सहन करणार नाही.

Shiv Sainik
Nana Patole Disagreement : विधान परिषद निवडणुकीत ठाकरे-काँग्रेसमध्ये पुन्हा खडाखडी; दोन उमेदवार मागे घेण्याचा पटोलेंचा ठाकरेंना सांगावा

चुकीचे बोललो असेल तर माफी मागतो : कोल्हे

माझ्याकडून अनावधानाने निकम यांचा उल्लेख भावी आमदार असा झाला आहे, मी चुकीचे बोललो असेल तर माफी मागतो. गैरसमज निर्माण करून घेऊ नका. महाविकास आघाडी निर्णय घेईल, त्याप्रमाणेच उमेदवार जाहीर केला जाईल. त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू. पण महाविकास आघाडी सर्वांनी एकसंघ ठेवावी, असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

Shiv Sainik
A Y Patil : ए. वाय. पाटलांमुळे राधानगरी काँग्रेसमध्ये खदखद? विधानसभेला उपरा नको

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com