Pune, 06 July : विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आले आहे. आताही खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. ऑन ड्यूटी असलेल्या महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांनी आपबित्ती सांगितली आहे.
पुण्यातील (Pune) फरास खाना पोलिस चौकीसमोर शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या (Police Officer) प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. विश्रामबाग (Vishram Bagh) पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संजय फकिरा साळवे असे त्या आरोपीचं नाव आहे. गुन्ह्या बाबतचा अधिकचा तपास पोलिस करत आहेत.
ज्या महिला अधिकाऱ्यांसोबत ही घटना घडली, त्यांनी याबाबतची आपबिती कथन केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या अधिकारी म्हणाल्या, पुण्यातील बुधवार चौकात एक व्यक्ती वेडीवाकडी गाडी चालवत आला होता. त्या ठिकाणी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला बाजूला घेतलं. त्याच्या तोंडाचा वास येत असल्याने पुढील तपासणीसाठी त्याला कार्यालयात आणण्यात आलं. मात्र त्याने कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
ब्रीद अनालायझरमध्ये फुंकण्यास त्यांनी नाकार दिला, त्यामुळे त्याला शांत करण्यासाठी एका बाजूला उभं करण्यात आलं होतं. त्याच्या तोंडात काहीतरी असल्याने चूळ भरण्यासाठी म्हणून तो बाजूला गेला. परत येताना त्याने पेट्रोल आणि लाइटर सोबत आणले होते, त्यावेळी हवालदार समीर सावंत हे त्याचं ब्रीद अनालायझर घेत होते. त्याचा राग धरून आरोपीने त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि तुला जाळतो, असं तो बोलू लागला.
हा सगळा प्रकार घडत असताना मी त्या ठिकाणी गेले, त्यावेळी त्याने माझ्याही अंगावर पेट्रोल टाकलं. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा दारू प्यायला असल्यामुळे त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार होती. त्याने पेट्रोल नेमकं कुठून आणलं. याबाबतचा तपास केला जात आहे.
हा सर्व प्रकार फरासखाना पोलिस चौकीच्या मध्यभागी घडला आहे. या परिसरात सीसीटीव्ही आहेत का आणि या सीसीटीव्ही मध्ये ही सगळी घटना चित्रित झाली आहे का, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत, असं त्या महिला अधिकाऱ्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.