Pune News : पुण्यातील बुधवार पेठमध्ये बांगलादेशी नागरिक असल्याबाबतच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होत्या. बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसायात ढकलण्याच रॅकेट देखील पोलिसांनी नुकतच उघड केले आहे. यानंतर आता बांगलादेशी बुलेट स्वार चोराचे कारनामे समोर आले आहेत.
खिडकी फोडून तब्बल ७.२५ लाख रुपयांचे महागडे कॅमेरे आणि ड्रोन चोरून नेलेल्या एका बांगलादेशी गुन्हेगाराचा शोध घेण्यात अलंकार पोलिसांना यश आले आहे.
आरोपीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक करण्यात आली असून, त्याच्यावर आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यांसह देशातील विविध भागांत ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. आरोपी बनावट नावाने देशभरात फिरत होता. त्याच्याकडे चोरीचा माल, विविध देशांचे परदेशी चलन तसेच बांगलादेशी पासपोर्ट सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, रा. ढाका, बांगलादेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका ३८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
कर्वेनगर येथील 'द टेरिटरी' या ऑफिसमधून १४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्याने खिडकीचा गज तोडून कॅमेरा, महागड्या लेन्स, ड्रोन आणि आयफोन असा एकूण ६ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात एक संशयित रॉयल एनफिल्ड बुलेटवरून जाताना दिसला.
तांत्रिक विश्लेषणानुसार, हा आरोपी पुण्यातून पसार होऊन हैदराबाद, चंद्रपूर, नागपूर, जबलपूर आणि मिर्झापूरमार्गे उत्तर प्रदेशात गेल्याचे स्पष्ट झाले. अखेर वाराणसी पोलिसांच्या मदतीने त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत बांगलादेशी पासपोर्टसह अमेरिकन डॉलर, चिनी, मलेशियन, सिंगापूर, कॅनेडियन आणि नेपाळी चलन जप्त करण्यात आले आहे.
आरोपीविरुद्ध आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तब्बल ३६ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २९ गुन्ह्यांत तो यापूर्वी अटकेत होता, तर ६ गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक गणेश दीक्षित, महेश निंबाळकर, जगन्नाथ भोसले, जगदीश तळोले, निशिकांत सावंत, धिरज पवार, सोमेश्वर यादव, राजेश शेळके यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.