Baramati Political News : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागावी म्हणून अॅड. केशव जगतापांसह कारखान्याचे संचालक योगेश जगतापही 'रेस'मध्ये होते. हे पद आपल्याला मिळावे म्हणून योगेश जगतापांनी मोठी ताकद लावली होती. यामुळे त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड होणार, यात कुणालाही शंका नव्हती. मात्र, एका दिवसात अशी काही उलथापालथ झाली, की योगेश जगतापांचा पत्ता कट होऊन माळेगावच्या अध्यक्षपदाची माळ केशवराव जगतापांच्या गळ्यात पडली. बारामती तालुक्यात आता या घडामोडींचीच चर्चा रंगली आहे. (Latest Political News)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलतात ते करूनच दाखवतात, याची प्रचिती पुरंदरनंतर माळेगाव कारखान्यातही आली. माळेगाव साखर कारखान्याच्या पुढच्या अध्यक्षाचे अडनाव तावरे सोडून इतर असेल, हा शब्द आहे, असे पवार बोलले होते. तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षाची शनिवारी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲड. केशवराव सर्जेराव जगताप, तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव देवकाते यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी केशवराव जगतापांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, बारामती नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि कारखान्याचे संचालक योगेश जगतापांनाही 'इंटरेस्ट' होता. यासाठी त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावली होती. आता योगेश जगतापच अध्यक्ष होणार, असे शुक्रवारी सकाळपर्यंत बोलले जात होते. त्यानंतर काही तासांतच बाजी पलटली आणि योगेश जगतापांचे नाव बाजूला होऊन अध्यक्षपदी केशव जगतापांची वर्णी लागली. (Maharashtra Political News)
माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी योगेश जगतापांनी संपूर्ण संचालक मंडळ, कारखान्याशी संबंधित नेते, स्थानिक पुढाऱ्यांसह आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन 'देवगिरी'वर शक्तिप्रदर्शन केले. त्यांना सभासदांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. देवगिरीवर त्यांनी अजितदादांशी संवाद साधून माळेगावच्या विषयांवर चर्चा केल्याची माहिती आहे.
अशा स्थितीत केशवराव जगताप (Keshavrao Jagtap) यांच्याकडे मात्र एकही मोठा नेता नव्हता. त्यामुळे केशव जगतापांच्या विश्वासू शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अखेर देवगिरी गाठली. तेथे अजित पवारांशी साधकबाधक चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक राजकीय ताकद पाहता शुक्रवारी सकाळपर्यंत योगेश जगताप अध्यक्ष होणार, असेच चित्र निर्माण झाले होते. यातच ऐनवेळी माळेगाव कारखानासंबंधित काही बड्या नेत्यांनी केशव जगतापांना पाठिंबा दिला. तसेच काही वरिष्ठ मंडळींनीही केशव जगताप हे अनुभवी, ज्येष्ठ, तज्ज्ञ असल्याची अजित पवारांकडे बाजू मांडली. यातून अजित पवारांचाही कल केशव जगताप यांच्याकडे वाढल्याचे बोलले जात आहे. त्यानंतरच वरिष्ठांना संधी देण्याच्या हेतूनेच अजित पवारांनी निर्णय बदलल्याचे बोलले जात आहे.
माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी खूप प्रयत्न केले होते, असे योगेश जगताप यांनीही 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, 'अध्यक्षपदी वर्णी लागावी, यासाठी मोठी ताकद लावली होती. ती स्पर्धा फक्त निवडीपर्यंत होती. मात्र, पक्षनेतृत्वाने अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर स्पर्धा तेथेच संपली. आता अध्यक्ष म्हणून माझा केशवबापूंना संपूर्ण पाठिंबा आहे. त्यांच्या निवडीने मी अजिबात नाराज नाही,' असा खुलासाही जगतापांनी केला.
दरम्यान, योगेश जगतापांनी आणखी जोर लावला असता, तर कदाचित माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली असती, असेही सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.