Pune News, 02 Apr : भोसरी विधानसभा मतदारसंघात (Bhosari Assembly) मोठ्या प्रमाणात मतदार यादी घोटाळ झाला असून कायद्याला अपेक्षित मोकळ्या व प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली नाही, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली असून न्या. आर.आय. छागला यांनी दिनांक 21 मार्च 2025 रोजी प्राथमिक सुनावणी झाल्यावर विधानसभा निवडणुकीत यश संपादन केलेल्या आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या विरोधात नोटीस जारी करून 15 एप्रिलपर्यंत याचिकेतील आरोपांना उत्तर देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार म्हणून अजित दामोदर गव्हाणे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आपल्या बाजूने मतदारांमध्ये अत्यंत सकारात्मक वातवरण असताना अचानक महेश लांडगे मताधिक्याने निवडून आले असं गव्हाणे यांचं मत आहे.
त्यामुळे महेश लांडगे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका गव्हाणे यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. राजाभाऊ चौधरी यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेमध्ये तब्बल 62,000 बनावट मतदारांचा समावेश करण्यात आल्याचा दावा केला आहे.
तसंच जे मतदार विरोधात मतदान करतात अशा 15,000 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळून महेश लांडगेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने नियोजनबद्ध भ्रष्टाचार केल्यचे काही पुरावे असल्याचंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. शिवाय अजित गव्हाणे यांच्यातर्फे याचिकेसोबत काही पुरावे दाखल करण्यात आल्याची माहिती देखील वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.
भोसरी विधानसभेची निवडणूक प्रक्रिया शंकास्पद असल्याचे प्रथमदर्शनी नमूद करून विशेष म्हणजे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी अशा अनेकांची भूमिका संशयास्पद असल्याचे याचिकेत म्हटलं आहे.
एकाच नावाच्या, वय, घराचा पत्ता सारखाच असलेल्या व्यक्तींना वेगवेगळे मतदान आयडी कार्ड देणे, सारखीच नावे, वय व सारखा मोबाईल नंबर असलेल्या अनेक लोकांना मतदार म्हणून नोंदवून घेणे अशी 62000 बोगस मतदारांची नावे भोसरी येथील मतदार यादीत समाविष्ट असल्याची लेखी तक्रार मतदार यादी नक्की करण्याच्या आधीच देण्यात आली होती.
मात्र, त्याची दखल मुद्दाम घेण्यात आली नाही असा आरोप गव्हाणे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत खरा भ्रष्टाचार मतदार यांद्यांचा आणि त्यासोबत ईव्हीएमचा निवडक भाजप व महायुती केंद्रित वापर असा व्यापक असल्याचे ॲड. असीम सरोदे म्हणाले. संगनमताने बनावट-खोट्या व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी याबाबत पारदर्शकता न ठेवणे.
17C फॉर्म्स, सिसिटीव्ही फुटेज माहिती अधिकारात न देणे आणि माहिती मागण्याचा मूलभूत अधिकार निवडणूक आयोगाने फेटाळणे, एकूण ईव्हीएम मशिन्सच्या 5 टक्के मशीन्समधील मतांचे व्हेरिफिकेशन व्हावे असे सर्वोच्च न्यायालयाचे 2013 मधील आदेश न पाळणाऱ्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारच्या सूचनेवरून निवडणूक आयोगाने काढणे हे षडयंत्र असल्याचा आरोप सुद्धा याचिकेतून करण्यात आलेला आहे.
अत्यंत नियोजनबद्ध मतदार यादी घोटाळा तसेच पारदर्शक निवडणूका आणि मतमोजणी होऊ न देणे हे खोलवरील षडयंत्र लक्षात घेता महेश लांडगे यांची निवडणूक बेकायदेशीर ठरवावी व दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त झालेल्या अजित गव्हाणे यांना विजयी घोषित करावे अशी मागणी या निवडणूक याचिकेतून करण्यात आलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.