चैतन्य मचाले -
Pune News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बैठका घेऊन नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा-विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करून दिशा ठरविण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. मात्र, या शिबिराला पुणे शहरातील पक्षाचे माजी महापौर, माजी आमदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा-विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असलेल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेश भाजपच्या वतीने उरण मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये दोनदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात विविध विषयांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत सूचना दिल्या. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मनगुंटीवार, यांनी पक्षबांधणीसाठी तसेच पक्षवाढीसाठी काय प्रयत्न करावेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या महत्त्वाच्या शिबिराला पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकारी मात्र अनुपस्थितीत होते. आपण गैरहजर असल्याची कारणे प्रत्येक पदाधिकाऱ्याने वेगवेगळी दिली असली तरी या प्रमुख पदाधिकाऱ्यांमधील उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांच्यात सध्या सुरू असलेली चढाओढ, पक्षांतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे.
याबाबत वरिष्ठ नेत्यांच्या कानावर तक्रारीदेखील गेल्या आहेत. या शिबिराच्या निमित्ताने वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे आपल्याला ऐकविल्यास अडचण नको म्हणून काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिबिराला जाण्याचे टाळण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
आगामी लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी काही वरिष्ठ पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. आपणच कसे लोकसभेचे उमेदवार असू शकतो, हे दाखविण्यासाठी या पदाधिकाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
आयोजित कार्यक्रमांचे माहितीचे फलक केवळ आपल्या मतदारसंघात न लावता शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांतही लावण्यास या पदाधिकाऱ्यांनी सुरुवात केलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा सुप्त संघर्ष चांगला सुरू असून, काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांकडून 'भावी खासदार' अशा आशयाचे फलकदेखील शहरभर लावले जात आहेत.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या या कुरघोडीची माहिती वरिष्ठ नेत्यांच्या कानावर गेलेली आहे. पक्षवाढीसाठी हे प्रकार धोकादायक असून, यामध्ये तातडीने आवश्यक ते बदल करण्यात यावेत, अशा सूचना वरिष्ठ नेत्यांनी शहरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. उमेदवारीसाठी सुरू असलेला हा संघर्ष वाढतच असून, एकमेकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरात सध्या सुरू असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या या संघर्षावर या दोनदिवसीय शिबिरात चर्चा होऊन वरिष्ठांकडून पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी होईल, अशी अपेक्षा होती. याबाबत शिबिरात काही चर्चा झाली का, अशी विचारणा उपस्थित असलेल्या काही पदाधिकाऱ्यांकडे केली असता, 'अहो, ज्यांचे कान टोचायचे तेच गैरहजर मग कान कोणाचे टोचता?' असा प्रतिप्रश्न उपस्थित करत यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.