Pune News: देशात भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा अनेकदा केला जातो.पक्षाच्या संघटन कौशल्यामुळे गेली दोन टर्म केंद्रात तसेच अनेक राज्यात भाजपची निर्विवाद सत्ता आल्याचे सिद्ध झाले आहे. ही सत्ता आणण्यामध्ये स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा,पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा असला तरी लोकसभा,विधानसभेचा उमेदवार तसेच पक्षात कोणाला घ्यायचे याचा अधिकार स्थानिक पातळीवर नसल्याचे समोर आले आहे. पक्षाचे शहराध्यक्षांनीच स्वतः ही कबुली दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे.याचाच एक भाग म्हणून शहर भाजपच्या वतीने ' बूथ चलो अभियान'राबविले जाणार आहे. 4 ते 11 फेब्रुवारी यादरम्यान पुणे लोकसभा (Pune Loksabha) मतदारसंघातील दोन हजार 10 बुथवर हे अभियान राबवले जाणार आहे.
यासाठी प्रत्येक बूथसाठी एक प्रवासी कार्यकर्त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आगामी निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी हा कार्यकर्ता या बुथवर भेट देणार आहे. केंद्र शासन आणि राज्य सरकारची विकासकामे आणि योजना या अभियानातंर्गत मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
या अभियानात खासदार,आमदार,माजी नगरसेवक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत. हे सर्व पदाधिकारी त्यांना नेमून दिलेल्या बुथवर जाऊन संपूर्ण दिवस तेथे काम करणार आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी सांगितले.या अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या सुचनेनुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील दोन हजार दहा बूथवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
घाटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न शहराध्यक्ष घाटे यांना विचारला असता, आमच्याकडे लोकसभेचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार पक्षाच्या सेंट्रल पार्लमेंट्री बोर्डला असतो. उमेदवार ठरविताना त्यासाठी केंद्रीय पातळीवर सर्व्हे केला जातो. त्यानंतर हा उमेदवार निश्चित होतो. शहर भाजपकडे(BJP) कोणी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे का? तुम्ही शहर पातळीवरून कोणाचे नाव निश्चित केले आहे का? किंवा कोणाचे नाव वरिष्ठांना सांगणार आहात का? असे अनेक प्रश्न घाटे यांना विचारले असता हे सर्व केंद्र स्तरावर ठरते, असे त्यांनी सांगितले.
शहराध्यक्ष म्हणून तुम्ही उमेदवार सुचवू शकत नाही का? तसेच एखाद्या पदाधिकाऱ्याला निवडणूक लढवण्याची इच्छा असेल तर काय करावे, असे घाटे यांना विचारले असता, आम्हाला काहीच अधिकार नाही, जे होते, ते सर्व केंद्र पातळीवर होत असते. तसेच इतर पक्षातून कोणी येण्याची तयारी दाखविली तरी प्रदेशाध्यक्ष पातळीवरच याचा निर्णय होतो, अशी खंतही घाटे यांनी व्यक्त केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.