

Pune ZP : महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असतानाच राजकीय पक्षांची जिल्हा परिषदेसाठीही तयारी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गत आठवड्यात पुणे जिल्ह्यात 3 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. त्यानंतर आता ते भाजपला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी शुक्रवारी (9 जानेवारी) मध्यरात्री अजित पवार यांची पुण्यातील जिजाई निवासस्थानी भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीनंतर बुट्टे पाटील यांच्या राष्ट्रवादी पुनरागमनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भेटीवेळी शरद बुट्टे पाटील यांच्यासह पत्नी सुनीता बुट्टे पाटील, माजी सभापती चांगदेव शिवेकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ टेमगिरे, आंबेठाणचे सरपंच दत्ता मांडेकर, श्रद्धा मांडेकर, यांच्यासह विविध गावांचे सरपंच, चेअरमन व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीत भामा खोऱ्यातील रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, पाईट-आंबेठाण जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. या गटातून सुनीता बुट्टे पाटील या उमेदवारी असण्याची शक्यता आहे.
कोण आहेत शरद बुट्टे पाटील?
शरद बुट्टे पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून राजकीय सुरुवात केली होती. त्यानंतर ते दोनवेळा जिल्हा परिषद सदस्य राहिले. या दरम्यान, वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी ते जिल्ह्याचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बनले होते. पण 2014 मध्ये पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत संधी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रवेशानंतरही अजित पवार यांनी बुट्टे पाटील यांना तालुक्याच्या राजकारणात मदतीची भूमिका घेतली होती.
2019 आणि 2024 मधील लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान पवार यांनी जाहीरपणे बुट्टे पाटील यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध अधोरेखित केले होते. तर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आणि खेड तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी दिलीप मोहिते-पाटील यांच्या विरोधात एकवटले होते. त्यावेळी शरद बुट्टे पाटील यांनी मोहिते-पाटील यांना मदत केली होती. त्यामुळे मध्यरात्री जिजाई बंगल्यावर बुट्टे पाटील यांनी अजितदादांची घेतलेली भेट ही केवळ विकासकामांसाठी आहे असे म्हणणे चुकीचे ठरू शकते.
विविध विकासकामांसाठी निधीची मागणी :
चाकण-करंजविहिरे-वांद्रा, शिरोली-पाईट-वांद्रा या मुख्य रस्त्यांनाआणि कडूस-किवळे-कोरेगाव, चांदुस-कोरेगाव-कुरकुंडी-धामणे या प्रमुख जिल्हा मार्गांना तसेच श्री क्षेत्र कुंडेश्वर येथील घाट रस्त्याचे रुंदीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून मोठा निधी मिळावा अशी मागणी केली. त्याचबरोबर भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी निवडणुकीनंतर बैठक आयोजित करावी, दुर्गेश्वर लेणी गडद आणि येसूबाई मंदिर कोळीये यांना क वर्ग तीर्थक्षेत्र क्षेत्र दर्जा मिळावा, आंबेठाण येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे यासह जिल्हा वार्षिक योजना आराखड्यातून मार्चमध्ये विविध विकास कामांना निधी मिळावा अशी देखील मागणी यावेळी बुट्टे पाटील यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.