

Pune News : पुण्यातील राजकीय वातावरण जैन बोर्डिंग होस्टेलच्या जमीन वादाने तापले आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंग होस्टेलची 3.5 एकर जागा बेकायदेशीरपणे हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजपने नेते गणेश बिडकर यांना मैदानात उतरवले असून, रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यावरच वक्फ बोर्डाची 100 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप करत एक जुना प्रकरण पुन्हा उकरून काढला आहे.
शिवाजीनगरातील जैन बोर्डिंग होस्टेलची 3.5 एकर जागा बेकायदेशीर रित्या गोखले कन्स्ट्रक्शन या बिल्डर कंपनीला विकली गेल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. ही जागा जैन ट्रस्टच्या ताब्यात असून, ती विद्यार्थी वसतिगृह, मंदिर आणि सामाजिक कार्यांसाठी वापरली जात होती. डिसेंबर 2024 मध्ये ट्रस्टच्या विश्वस्त्यांनी विक्रीचा निर्णय घेतला आणि 8 ऑक्टोबर 2025 रोजी व्यवहार अंतिम झाला. धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर पदाचा गैरवापर करून धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.
"मोहोळ हे गोखले बिल्डर्सचे भागीदार होते, त्यामुळे त्यांचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे," असा दावा धंगेकरांनी केला. मोहोळ यांनी आरोप फेटाळले असून, "मी 11 महिन्यांपूर्वी गोखले बिल्डर्सशी भागीदारी तोडली होती. हे राजकीय हल्ले आहेत," असे सांगितले.
जैन बोर्डिंग वादात धंगेकर आक्रमक असताना, भाजप (BJP) नेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत धंगेकरांवर वक्फ बोर्डाच्या 100 कोटींच्या जमिनीचा घोटाळा केल्याचा जुना मुद्दा चर्चेत आणला आहे.डॉ. महमंदखान करीमखान व त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी 1935 साली लक्ष्मी रस्त्यावरील सतरा हजार तीनशे फूट क्षेत्रफळ असलेली सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गणेश बीडकर म्हणाले, “डॉ. महमंदखान करीमखान यांनी ही मालमत्ता वक्फला देताना या मालमत्तेचा कशासाठी वापर करण्यात यावा, हे आपल्या वक्फनाम्यात स्पष्ट केले होते. या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न मशिदीसाठी, गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दफनविधी, गरिबांचे लग्नकार्य आदी समाजउपयोगी कार्यासाठी खर्च करावे, असा उदार विचार डॉ. महमंदखान करीमखान यांनी 1936 साली वक्फनाम्यात मांडला होता. मात्र "वक्फ कायद्याचे उल्लंघन करून कोट्यवधींची संपत्ती वैयक्तिक फायद्यासाठी वापरली गेली," असे बिडकर यांनी केले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे.
हा मुद्दा धंगेकरांनी मार्च 2025 मध्ये काँग्रेस सोडून शिंदे गटात प्रवेश केला तेव्हाही चर्चेत आला होता. ठाकरे गट आणि काँग्रेसने तेव्हा दावा केला होता की, "प्रतिभा धंगेकरांना अटकेची भीती असल्याने पक्षांतर झाले," असे आरोप ठाकरे सेनेकडून तसेच काँग्रेसकडून देखील करण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या जमिनीच्या मुद्द्यावरून धंगेकरांना घेरण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.