Pune News : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांत नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही तालुकाध्यक्ष हे शिरूर-हवेली मतदारसंघाचे प्रमुख प्रदीप कंद यांच्या मर्जीतील आहेत, त्यामुळे कंद यांचे पक्षसंघटनेवर वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. दोन्ही तालुकाध्यक्ष मर्जीतील नेमून प्रदीप कंद यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘मास्टर स्ट्रोक’ मारल्याचे मानले जात आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी सध्या ते शर्यतीत आहेत. (BJP's Shirur and Haveli taluka president favor of Pradeep Kand)
भाजपच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा आबासाहेब सोनवणे यांची वर्णी लागली आहे. सुमारे १८ महिन्यांपूर्वी माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचर्णे यांच्या शिफारशीवरून त्यांना तत्कालीन तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांच्या राजीनाम्यानंतर तालुकाध्यक्षपदाची संधी मिळाली होती. मात्र, त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची दखल घेऊन जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी पुन्हा त्यांना संधी दिली आहे.
भाजपसाठी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ हा आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी आशेचा किरण आहे. भाजपने हा मतदारसंघ तीनदा जिंकला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा तालुकाध्यक्ष सक्षम हवा, असा सूर होता, त्यामुळेच ही निवड काही दिवस लांबली होती. तालुकाध्यक्षपदासाठी माजी आमदार दिवंगत बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे यांच्या नावाचीही चर्चा होती. मात्र, त्यांच्या संमतीनंतरच सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल, माजी आमदार बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील आणि पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप कंद यांनी सर्वांशी चर्चा करूनच सोनवणे यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, गेल्या १८ महिन्यांच्या कार्यकाळात आबा सोनवणे यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक, जिजामाता सहकारी बॅंक निवडणूक, शिरूर नगर परिषद व्यापारी संकुल प्रकरण, शिरूर बाजार समिती बरखास्त प्रक्रिया, शिरूर खरेदी-विक्री संघ निवडणूक पुढे ढकलणे या सर्व प्रक्रियेत पक्षाची बाजू लावून धरली होती. चासकमानच्या आवर्तनासाठीही आग्रही भूमिका घेतली होती.
शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघ हा शिरूर आणि हवेली या दोन्ही तालुक्यांमधील काही भाग एकत्रित करून २००९ मध्ये अस्तित्वात आलेला आहे. प्रदीप कंद हे हवेलीतून येतात, तर राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार शिरूरमधून येतात. कंद यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपत प्रवेश केल्याने तेच उमेदवार राहतील, अशी अटकळ होती. मात्र, दिवंगत पाचर्णे यांना खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली. मात्र, ते पराभूत झाले.
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत कंद आणि पवार यांच्यातच लढत होण्याचे संकेत आहेत. त्यादृष्टीने भाजपने कंद यांना मतदार संघाचे प्रमुख म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. दोन्ही तालुक्यांचे पक्षाचे अध्यक्ष कोण निवडले जाणार, याची उत्सुकता असतानाच माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे यांना हवेलीचे तालुकाध्यक्ष नेमले आहे. शिरूरचे सोनवणे व हवेलीचे गावडे हे दोघेही उघड नसले तरी कंदांच्या उमेदवारीचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्या नावासाठी कंदांनीही आपली ताकद प्रदेशपर्यंत वापरल्याची चर्चा आहे. कंदांना मतदारसंघ प्रमुखपदाची मिळालेली जबाबदारी आणि त्यांच्याच म्हणण्यानुसार सोनवणे-गावडे यांची निवड म्हणजे आगामी निवडणुकीसाठी कंदांचा मास्टर स्ट्रोक मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.