

Pune News : निवडणुकीदरम्यान आणि निवडणूक निकालानंतर मतदार याद्यांमधील घोळाबाबत मोठ्या प्रमाणात टीका करणारे आणि आपल्या पराभवाला निवडणूक यादी जबाबदार असल्याचं सांगणारे राजकीय पक्ष आणि नेते प्रत्यक्ष कामाच्या वेळी मात्र ढिम्म असल्याचं धक्कादायक चित्र पुण्यात समोर आलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुर्नरीक्षण मोहिमेकडं पुण्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी साफ पाठ फिरवली आहे. पुणे जिल्ह्यातील मतदार यादी अचूक करण्यासाठी तब्बल १ लाख ९ हजार ४२१ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची (बीएलए) आवश्यकता असताना, प्रत्यक्षात २२ जूनपर्यंत केवळ १२ हजार ४९८ प्रतिनिधींचीच नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल ९६ हजार ९२३ पदे अद्याप रिक्त असून, कामाची ही टक्केवारी केवळ ११.४२ टक्के एवढीच आहे.
विशेष म्हणजे, राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकाही राजकीय पक्षाने अद्याप आपला प्रतिनिधी नियुक्त केलेला नाही. येथे सर्वच पक्षांची पाटी 'निरंक' आहे.
३० जूनपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. या प्रक्रियेत 'बीएलओ'ना मदत करणे, मतदारांची पडताळणी करणे, नवीन मतदार शोधणे, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यास मदत करणे आणि मतदार यादीतील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी राजकीय पक्षांच्या 'बीएलए' वर असते.
यापूर्वी बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारच्या विशेष पुर्नरीक्षण मोहिमेनंतर मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली गेल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे मतदारांचे हक्क अबाधित राहण्यासाठी आणि बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी या प्रतिनिधींची भूमिका अत्यंत कळीची मानली जाते. मात्र, पुण्यात सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहिलेले नाही, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
भारतीय जनता पक्ष - ५,४५५
राष्ट्रवादी काँग्रेस - ३,२७६
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - १,३३२
शिवसेना १,३२२
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - ८९१
काँग्रेस - २२२
इतर पक्ष (मनसे, आप, बसप, सप, भाकप, आरपीआय) - ०
पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांसाठी ८ हजार ४१७ 'बीएलओ' नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रत्येक अधिकाऱ्याला मदत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रतिनिधी नेमणे अपेक्षित आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करताना मतदार याद्या पारदर्शक असणे हा पाया आहे. मात्र, गाजावाजा करत जनसंपर्क दौरे काढणाऱ्या नेत्यांना आणि पक्षांना मतदार यादी सुधारण्याच्या या अत्यंत महत्त्वाच्या कामाचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. अद्यापही ९६ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याने, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम केवळ शासकीय सोपस्कार ठरते की काय, अशी भीती आता व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.