पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि उद्योजक सतीश वाघ यांचा खून करण्यासाठी पत्नी मोहिनी मागील एक वर्षापासून कट रचत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला मोहिनेने एका मांत्रिकाचीही भेट घेत जादुटोणा केला होता. त्यानंतर अक्षय जावळकर याने पवन शर्मा याला पाच लाख रूपयांची सुपारी दिली, असा दावाही पोलिसांनी केला आहे.
सतीश वाघ यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत या प्रकरणी गुन्हे शाखेने लष्कर न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध एक हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि मोहिनी यांच्या प्रेमसंबंधात सतीश वाघ अडसर ठरत असल्याने हा खून झाल्याचे आरोपपत्रात नमूद केले आहे.
आरोपी अक्षय जावळकर हा वाघ यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर राहत होता. या दरम्यान, अक्षय आणि मोहिनी यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. पण या संबंधात मोहिनीचे पती सतीश वाघ अडथळा ठरत होते. त्यामुळे तिने वर्षभरापूर्वीच पतीचा काटा काढण्याचे नियोजन सुरू केले. यासाठी तिने एका मांत्रिकाची भेट घेतली होती. या मांत्रिकाकडून वाघ यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पण त्यानंतरही त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्यामुळे अक्षयने मोहिनीच्या सांगण्यावरून आरोपी पवन शर्माला पाच लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी फिरण्यास गेले असता आरोपी शर्मा आणि साथीदारांनी सतीश वाघ यांचे मोटारीतून अपहरण केले. त्यानंतर वाघ यांच्यावर अवघ्या 15 मिनिटांत धारदार शस्त्राने 72 वार करून खून केला.
त्यानंतर वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात आढळून आला होता. आरोपींनी खून केल्यानंतर हत्यार पेरणे पुलाजवळ भीमा नदीपात्रात फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत अवघ्या काही दिवसांत अक्षय जावळकर, मोहिनी वाघ, आतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना अटक केली होती.
आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली मोटार, 16 ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण, सतीश वाघ यांचा मोबाईल आणि 1 लाख 56 हजारांची रोकड जप्त केली होती. आता पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या तपासकामी 35 साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.