
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे नेते दीपक मानकर यांच्यावर पोलिसांनी बनावट कागदपत्र सादर केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अखेर शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता मानकरांचा मुलगा करण दीपक मानकर (Deepak Mankar) तसेच करण याचे सासरे सुखेन शाह यांच्यावरही देखील बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुणे शहरातील समर्थ पोलिस ठाण्यात दाखल बनावट कागदपत्र सादर केल्याच्या गुन्ह्यात करण दीपक मानकर, शंतनू सॅम्युअल कुकडेसह इतर जणांवर वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेड हाऊस फाउंडेशनचा शंतनू कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणी पहिला व त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा समर्थ पोलिसांत दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांचा तपास सुरू असतानाच कुकडे व रोनक जैनच्या बँक खात्यामधून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते.
त्यानंतर समर्थ पोलिसांंनी केलेल्या चौकशीत दीपक मानकर, करण दीपक मानकर आणि सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्या बँक खात्यावर कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
याबाबत पुणे (Pune) शहरातील समर्थ ठाण्याच्या पोलिसांनी दापक मानकर यांचे चिरंजीव करण मानकर व त्याचे सासरे सुखेन शहा यांच्याकडे या आर्थिक व्यवहाराबाबत कसून चौकशी केली. यावेळी डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू कुकडे पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता.
हे कर्ज पुढील 40 वर्षांसाठी असल्याची माहिती करण मानकरनं पोलिसांना दिली होती. तसेच या व्यवहारासंबंधी 500 रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाल्याची माहितीही त्यानं दिली होती.
मात्र, संबंधित दस्ताऐवज हे बनावट तयार केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. मानकर यांनी पोलिसांना जो दस्त क्रमांक सांगितला, तो दुसऱ्याच व्यक्तीने नियमानुसार खरेदी केल्याची बाब उघडकीस आली. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी अखेर करण मानकर याच्यासह इतर जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शंतनू कुकडेच्या बँक खात्यातून करण मानकरचे सासरे सुखेन शाह यांच्या मुलाच्या नावे पिंपरीत रिसॉर्ट करायचे असल्याचे सांगत तब्बल 6 कोटी 52 लाख रुपये घेतले. त्याबाबत 500 रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामाही केला होता. मात्र, तो करारनामा केलेला दस्त देखील बनावट असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आल्यानंतर सुखेन शाह यांच्यासह रौनक जैन, शंतनू कुकडे व इतरांवर समर्थ पोलिसांनी आता स्वतंत्रपणे गुन्हा दाखल केला आहे.
दीपक मानकर यांच्यावर पुणे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्काराच्या आरोपाखाली अटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्व पदाधिकाऱ्याकडून एक कोटी रुपयाची देवाणघेवाण प्रकरणांमध्ये मानकर यांनी बनावट कागदपत्रे पोलिसांना सादर केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
यानंतर मानकरांनी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मानकर यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपलं राजीनामाचे पत्र पाठवला असून आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती केली होती. त्यानंतर पक्षाकडून मानकरांचा राजीनामा स्विकारण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.