Pune News: कल्याणीनगर मधील पोर्श मोटार अपघाताची (Pune Porsche Accident) घटना ताजी असतानाच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना हिट अँन्ड रन प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वेगाने स्कार्पीओ चालवून त्यांच्या गाडीने रस्त्यावरील दोन वाहनांना धडक दिली. अपघातानंतर ते पळून गेले होते. ही घटना तळेगाव दाभाडे शहरात घडली.
पोलिसांनी तीन तासांच्या प्रयत्नानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे (Talegaon Dabhade CEO) मुख्याधिकारी एन. के. पाटील (N.K.Patil) यांना त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात अपघातप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदिप रायण्णावर यांनी सांगितले.
एन के पाटील कार चालवत घरी जात असताना तळेगाव स्टेशन दरम्यान त्यांनी दोन कारला पाठीमागून ठोकर दिली. सुदैवाने या कारमध्ये कोणी नसल्याने कोणाला काहीच इजा झाली नाही, मात्र यावेळी मुख्याधिकारी अपघात करून पळून गेले. हा प्रकार ड्रंक अँड ड्राईव्हचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुण्यात नुकत्याच घडलेल्या पोर्श अपघातानंतर तळेगावातील एका मोठ्या सरकारी अधिका-याकडून झालेल्या या हिट अँन्ड रन अपघाताची मोठी चर्चा तळेगाव दाभाडे परिसरात आहे.
अपघात झाल्यानंतर मुख्याधिकारी एन के पाटील यांना थांबवून विचारणा केली असता, त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हते व त्यांनी मद्य प्राशन केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. दारु पिऊन गाडी का चालविता? असे विचारले असता एन. के. पाटील त्यांच्या कारसह अपघात स्थळावरुन पळून गेले.
या अपघाताबाबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पाटील यांच्या निवासस्थानी त्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर,उपनिरीक्षक संदेश इंगळे आणि इतर चार पोलिस कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवून पाटील यांना दार उघडण्यास भाग पाडले.
पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी मुख्याधिका-यांकडून जप्त केलेली लाल रंगाची स्कार्पीओ गाडी सोलापूर येथील एका महिलेच्या नावावर आहे, त्यावर महाराष्ट्र शासन अशी पाटी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.