चंद्रकांतदादांची विधानसभेसाठी पुण्यातील कसबा मतदारसंघातून चाचपणी

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनाही आपण लोकांमधून निवडून जावे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते भाजपसाठी सुरक्षित असलेल्या मतदारसंघांत चाचपणी करीत आहेत.
चंद्रकांतदादांची विधानसभेसाठी पुण्यातील कसबा मतदारसंघातून चाचपणी
Published on: 
Updated on: 

पुणे : पुण्याचे पालकमंत्री, महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातुनही चाचपणी करत असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

गिरीश बापट हे पुण्यातून लोकसभेवर निवडून गेल्यानंतर कसब्याचा उत्तराधिकारी कोण, यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे 'माझ्या उमेदवारीबाबत पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल', असे पाटील यांनी नुकतेच पुण्यात बोलताना सांगितले होते.

कसब्यासाठी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यासह स्वीकृत नगरसेवक आणि चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय गणेश बीडकर यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र थेट प्रदेशाध्याक्षच कसब्यातून चाचपणी करत असल्याची माहिती पुढे आल्याने इच्छुकांचे 'इच्छा' आपसूकच विरली जाणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून बापट यांचे गेली 25 वर्षे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर चंद्रकांत पाटील यांनी कसब्यातून लढण्याचा निर्णय घेतलाच तर पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी बापट यांच्यावरच येणार आहे. शिवाय इच्छुकांची संख्या अधिक असल्याने भाजपअंतर्गत होऊ शकणारे शह-काटशाहचे राजकारण पाटील यांच्या उमेदवारीमुळे टळू शकणार आहे.

पाटील यांची राजकीय कारकीर्द गेल्या पाच वर्षांत बहरत असताना 'लोकांमधून निवडून यावं' अशी टीका त्यांच्यावर सातत्याने होत आहे. त्याचमुळे की काय गेल्या वर्षभरापूर्वी यापुढे कोणतीही निवडणूक न लढण्याची जाहीर केलेली भूमिका पाटील यांनी बदलत 'पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन' अशी नवी भूमिका जाहीर केली आहे. पाटील हे पुण्याचे पालकमंत्री असून जर कसब्यातून ते लढले आणि निवडून आले तर त्यांच्याकडेच पालकमंत्रीपदाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्याचा नेतृत्त्वाचा मुख्यमंत्र्यांना सतावणारा प्रश्न आपोआप सुटणार आहे.

दुसरीकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातूनही पाटील निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. मात्र कसब्यासारखा 'सेफ' मतदारसंघ शोधून पाटील राज्यभर प्रचारासाठी 'मोकळे' राहू शकतील, त्यामुळे ते कसब्यातूनच निवडणूक लढू शकतात, असा कयास बांधला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.