Pune News : शहरात गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्याच्या घटना घडले आहे यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन पावसाळी कामांचे नियोजन करण्याचे सूचना केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या अश्विनी कदम यांनी माधुरी मिसाळ यांच्यावर टीका केली आहे. या पावसाळी कामाच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
पुणे (Pune) शहरात नुकत्याच झालेल्या पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले. पर्वती, बिबेवाडी, पद्मावती आणि सिंहगड रस्ता परिसरात पाणी साठून राहिल्याने नागरिकांसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. नालेसफाई न केल्याने आजूबाजूच्या घरात पाणी शिरणे, वादळ वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे पडली, ज्यामुळे ट्रॅफिकच्या समस्या उद्भवल्या, तर कामासाठी रस्ते खोदल्याने त्यात पाणी साठून मोठे खड्डे तयार झाले. यामुळे अपघात होऊन अनेकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उभा राहिला आहे. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करणे अपेक्षित असते, मात्र, सध्या अशी परिस्थिती निर्माण झालीय की पुणेकर जीव मुठीत घेऊन बाहेर फिरत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनाच प्रशासनाला जाब विचारावा लागत असल्याचा टोला कदम यांनी लगावला.
गेली अनेक वर्षं सतत पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून नालेसफाईच्या बाबतीत दुर्लक्ष केलं जातं. पर्वती आणि परिसरात आंबिल ओढ्याची दुर्घटना होऊन गेलेली असतानाही अजूनही नालेसफाईकडे गांभीर्याने बघितले जात नाही. वेळोवेळ पाठपुरावा करून, अर्ज देऊनही पावसाळ्यात नाल्यांची सफाई न झाल्याने त्याचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागतोच. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी प्रशासन आणि सत्ताधारी कुठे होते? त्यांना आता जाग कशी आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी या सर्व गैरसोयीबद्दल प्रशासनालाच जाब विचारला. मात्र, सत्ताधाऱ्यांनी यावर लक्ष देऊन वेळीच काम केलं पाहिजे की उलट महापालिकेत जाऊन प्रशासनाला जाब विचारला पाहिजे? इथे काहिसं उलट घडताना दिसतंय. आमदार मिसाळ यांचा पक्ष महापालिकेत सत्तेत आहे. तेव्हाही नालेसफाईकडे दुर्लक्षच झालं आणि आता पावसाळा सुरू झाल्यावर या स्वतःच पालिकेत (PMC) जाऊन प्रशासनाला जाब विचारत आहेत. म्हणजे 'सत्ताधारीच उलट्या बोंबा मारी'. इथे जर आमदारांनाच जाब विचारावा लागत असेल तर सामान्य जनतेने काय करायचे.
मागील अनेक महिने महापालिकेच्या निवडणूकाच न झाल्याने नगरसेवकांना निधी येणं बंद झालंय,आमदारच सर्व कारभार हाकत आहेत.हे असे किती दिवस चालणार? नागरिकांच्या सुरक्षेपायी काही लोकप्रतिनीधी स्वतः पुढे येऊन काम करतात. मात्र, आमदार मिसाळ यांच्याकडून गेल्या साडेचार वर्षात कुठेच दिसल्या नाहीत, आणि आता प्रशासनालाच जाब विचारून पुणेकरांची दिशाभूल करीत आहेत असंही अश्विनी कदम म्हणल्या
आपत्ती व्यवस्थापन हे गतीशील नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर बऱ्याच वेळाने प्रशासन जागे होते. अप्पर इंदिरानगर परिसरामध्ये झाड कोसळून एका वीस वर्षाच्या तरुण मुलाचा जीव घेतला. पद्मावती, सहकारनगर परिसरात मुसळधार पावसात झाडं रस्त्यावर कोसळतात. झाडं पडली की ट्रॅफिक जाम होते ज्याचा नागरिकांना खूप त्रास होतो, अशा वेळी आपत्ती व्यवस्थापन कुठे जातं, याकडे लक्ष देणारे कोण आहे का? आमदार मिसाळ यांनी आपल्या अधिकाराचा वापर करत या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे देखील कदम म्हणल्या.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.