NCP Sharad Pawar: संयुक्त आघाडी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही काही जणांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, शहरातील दोन प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्यानंतर त्यांना माघार घेण्यास सांगूनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या पाच उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना पक्षाने आपला पाठिंबा दर्शविला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संयुक्त आघाडी झाली आहे. संयुक्त आघाडीमध्ये जागा वाटप, पक्षचिन्हाबाबत चर्चा झाली होती. मात्र, ऐनवेळी दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगून एबी फॉर्म दिले होते. परिणामी अनेक प्रभागात दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आले होते. अखेर दोन्हीकडील नेत्यांनी बहुतांश उमेदवारांना सांगून माघार घेण्यास भाग पाडले होते.
दरम्यान, नवी पेठ - पर्वती (प्रभाग २७) या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धनराज जाधव (अ), दीपाली बारवकर (ब), अक्षता लांडगे (क), अशोक हरणावळ (ड) यांना घड्याळ चिन्हावर अधिकृत उमेदवारी दिली. तर, याच प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दिलीप अरूंदेकर (अ), अक्षदा गदादे (ब), अनिकेत ऊर्फ राकेश क्षीरसागर (ड) यांना उमेदवारी दिली होती. संयुक्त आघाडीमुळे अरुंदेकर, गदादे व क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माघार घेण्याचे आदेश देऊनही त्यांनी पक्षाचा आदेश झुगारून लावला.
याच पद्धतीने हडपसर गाव, सातववाडी (प्रभाग १६) या प्रभागामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वैशाली बनकर (अ), वर्षा पवार (ब), कमलेश कापरे (क) व योगेश ससाणे (ड) यांना घड्याळ चिन्हावर उमेदवारी दिली होती. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाग्यश्री जाधव व अविनाश काळे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाही पक्षाने माघार घेण्याचे आदेश दिले होते. त्यांनीही पक्षाचे आदेश डावलले. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अरूंदेकर, गदादे, क्षीरसागर, जाधव व काळे यांच्यावर पक्षाच्या शिस्तभंगाची कारवाई केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.