Pune News : गेल्या ७५ वर्षातील दौंड तालुक्याचा मंत्रीपदाचा वनवास आतातरी संपणार का? याकडे तालुक्यातील कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांना या आधी दोन वेळा मंत्रीपदाने हुलकावणी दिली आहे. आता यावेळी तरी मंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडते का? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Latest Marathi News)
विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने दौंडला मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी वाटत असली तरी, भाजप पक्ष हा धक्कातंत्र देण्यासाठी परिचित आहे. त्यामुळे काहीही घडू शकते या सुत्रानुसार कार्यकर्ते आशा धरून आहेत. बारामती लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याला या आधी मंत्रीपद मिळाले आहे. बारामती लगतचा तालुका म्हणून आतापर्यंत दौंडला मंत्रीपदाची संधी मिळाली नसली तरी आता मंत्रीपद मिळण्यासाठी हाच मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाजपचे एकमेव आमदार हा मुद्दापण तेवढाच महत्वाचा मानला जात आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत हायकमांडने अखेरच्या क्षणी जसे धक्कातंत्र दिले तसे काहीही घडू शकते. पुणे जिल्ह्यात चंद्रकांत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मंत्रीपदे आली आहेत. आता चौथ्या मंत्रीपदासाठी चढाओढ आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या झंझावातामुळे पुणे जिल्ह्यात भाजपची वाताहत झाली असताना कुल यांनी भाजपचे अस्तित्व जिवंत ठेवले. पुणे जिल्ह्यात भाजपचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पुणे जिल्हाच्या ग्रामीण भागासाठी भाजपला बळ द्यायचे असेल तर कुल यांचा पर्याय भाजपसमोर आहे. विधानसभा कामकाजाचा कुल कुटुंबियांना २८ वर्षांचा अनुभव आहे. मात्र त्यांचा आतापर्यंत मंत्रीपदासाठी कधीही विचार झाला नाही. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये कुल यांना आमदार करा मी त्यांना मंत्री म्हणून पाठवतो असे आश्वासन प्रचारा दरम्यान दिलेले आहे. फडणवीस खरेच कुल यांना मंत्रीपद देणार की, धनगर आरक्षणाप्रमाणे दिलेला शब्द बासणात गुंडाळून ठेवणार याची उत्सुकता लागली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, पिंपरी, इंदापूर, शिरूर, भोर, पुरंदर, मावळ या तालुक्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. दौंड तालुका कायम काँग्रेस प्रणित सरकारच्या मागे राहिला. मात्र सरकारकडून तालुक्याचा कधीही मंत्रीपदासाठी विचार झाला नाही. २०१४ पुर्वी कुल कुटुंबियांना मंत्रीपदासाठी कधीही अनुकूल परिस्थिती नव्हती. २०१४ नंतर राहुल कुल यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत येऊ लागले आहे.
राज्याच्या राजकारणात वडील, आई व मुलाला विधानसभेत काम करण्याची संधी मिळण्याची उदाहरणे दुर्मिळ आहेत. आमदार राहुल कुल यांनी हा मान मिळविला आहे. राज्याच्या राजकारणात कन्नड ( जि.औरंगाबाद ) विधानसभा मतदार संघात हर्षवर्धन जाधव यांनी हा मान मिळविलेला आहे. त्यांचे वडील रायभान जाधव व आई हे दोघेही पूर्वी आमदार होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.