राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी शिरूर मतदारसंघ ( Shirur Loksabha constituency ) जिंकण्याचा चंग बांधला आहे. यासाठी आता अजित पवारांनी यंत्रणा देखील कामाला लावली आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे. अजित पवार गटातील स्थानिक नेत्यांकडून उद्घाटन आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. उद्घाटनाच्या निमित्ताने मतदार संघ पिंजून काढण्यात येत आहे.
सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा खासदारकीसाठी कंबर कसली असून ते कामाला लागले आहेत. कोल्हेंकडून गाव-वाड्यांना भेटी देऊन त्यांच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकीकडे कोल्हे सक्रिय झाले आहे. दुसरीकडे, अजित पवारांनी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना देखील मतदारसंघामध्ये सक्रिय केलं आहे. वळसे-पाटलांचे शिरूर मतदारसंघातील दौरे वाढले आहेत.
( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )
नुकतेच वळसे पाटलांच्या हस्ते शिरुर तालुक्यातील मौजे सविंदणे येथील ३४ कोटी ५० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. मौजे सविंदणे येथे जलजीवन मिशन अंतर्गत २४ कोटी रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना उभारण्यात येत आहे. मडके वस्ती येथील ओढ्यावरील पुल बांधणे १ कोटी ३८ लाख रुपये, जलसंधारण महामंडळा अंतर्गत गेटेड बंधारे २ कोटी ७१ लाख आणि ३ कोटी १० लाख रुपये खर्चाच्या पिराचा माळ ते कवठे येमाई रस्त्याच्या भूमिपूजनासह २२ विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पाटील यांनी केले. यावेळी शिरुर तालुक्यातील विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देखील वळसे-पाटलांनी दिली.
राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विकास कामांचा पाढा वाचत वळसे-पाटील म्हणाले, "राज्य शासन महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मधील कालावधीत कोरोना नियंत्रणाला प्राधान्य दिल्याने विकासकामांची गती कमी होती. मात्र, आता विकासकामांना वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते आणि पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे."
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीमधून अजित पवार गट लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानला जात आहे. याबाबतचं सुतोवाच अजित पवारांनी यापूर्वी देखील केलं आहे. "शिरूरमध्ये उमेदवार देणार आणि जिंकून आणणारच," असं खुलं आव्हानं अजित पवारांनी कोल्हेंना दिलं होतं. त्यामुळे आगामी काळामध्ये कोल्हे विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष शिरूर मतदार संघामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याची विकासकामांच्या सपाट्याने सुरुवात झाल्याचं बोललं जात आहे.
Edited By : Akshay Sabale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.