Devendra Fadnavis : 'माझंही बेकायदा होर्डिंग लागलं तर पुरस्कारांच्या यादीत माझं नाव टाका'; फडणवीसांकडून पुणे महापालिकेच्या कारवाईचं कौतुक!

Pune Municipal Corporation action against illegal hoardings : पुण्यातील बेकायदा होर्डिंगविरोधात महापालिकेने केलेल्या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. 'माझंही बेकायदा होर्डिंग लागलं तर पुरस्कारांच्या यादीत नाव टाका', असं ते का म्हणाले? जाणून घ्या.
Maharashtra government amends Cooperative Act
Maharashtra government amends Cooperative Actsarkarnama
Published on: 
Updated on: 

पुण्यातील बेकायदा होर्डिंग आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनापासून कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, बेकायदा फ्लेक्स लावणाऱ्या राजकीय नेत्यांना उपहासात्मक पुरस्कार देण्याच्या महापालिकेच्या अस्सल पुणेरी संकल्पनेलाही मुख्यमंत्र्यांनी दाद दिली आहे. 'उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा,' असे फडणवीस यांनी पुणे महापालिका प्रशासनाला सांगितले आहे.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. त्यापाठोपाठ बेकायदा फ्लेक्सबाजी करणाऱ्या राजकीय नेत्यांविरोधातही प्रशासनाने मोहीम उघडली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह काँग्रेसचे गटनेते रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम यांच्या फ्लेक्सवरूनही प्रशासनाने उपहासात्मक पोस्ट केल्या आहेत. आता थेट मुख्यमंत्र्यांनीच प्रशासनाच्या या भूमिकेचे समर्थन केल्याने या मोहिमेला आणखी बळ मिळाले आहे.

नियम केवळ जीआरमध्ये प्रकाशित करण्यासाठी नसतात!

पुणे महापालिकेच्या कारवाईसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. पुण्यात सध्या अतिक्रमणांविरोधात आणि विशेषतः बेकायदा होर्डिंगविरोधात कारवाई सुरू आहे. त्याबद्दल पुणे महापालिका प्रशासनाचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी आणि पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी जागा असल्या पाहिजेत. नियम हे केवळ जीआर किंवा शासकीय दस्तऐवजांत प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचेसुद्धा असतात. सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे, हाच त्यामागील हेतू असतो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

'पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा!'

बेकायदा होर्डिंग ही केवळ पुण्यातील नाही, तर सर्वत्रच मोठी समस्या आहे. त्याविरोधात सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झाली पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल 'पुणेरी' धाटणीतील संकल्पना स्वीकारली, तिचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. 'पुणे प्रशासनाला मी सांगेन, उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा,' असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

नवल किशोर राम यांच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांचे बळ

पुण्यात अतिक्रमण आणि बेकायदा फ्लेक्सविरोधात महापालिका प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे गेल्या काही दिवसांपासून आयुक्त नवल किशोर राम चर्चेत आहेत. महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या फ्लेक्सचीही प्रशासनाने दखल घेतल्याने या मोहिमेला राजकीय संदर्भ प्राप्त झाला होता. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तरी आपले नाव पुरस्कारांच्या यादीत समाविष्ट करण्यास सांगितले आहे. त्यामुळे बेकायदा फ्लेक्सविरोधातील कारवाई करताना राजकीय पदाचा विचार करण्याची गरज नसल्याचा स्पष्ट संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

पुण्याच्या पॅटर्ननंतर आता नागपूरचा नंबर?

आगामी काळात नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातही बेकायदा होर्डिंग लावण्याचा धडाका सुरू होण्याची शक्यता मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नागपूर प्रशासनाने आतापासूनच जनजागृती करावी आणि बेकायदा होर्डिंगमुळे शहराचे विद्रूपीकरण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. 'नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही,' अशा शब्दांत फडणवीस यांनी सर्वच राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.

भिमाले, नागपुरे अन् कदमांनाही प्रशासनाचा चिमटा

पुणे महापालिकेने 'भाऊ, फ्लेक्स काढा!' ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांच्या सहभागातून अनधिकृत फ्लेक्सची माहिती संकलित केली जात आहे. शहरात सर्वाधिक बेकायदा फ्लेक्स झळकणाऱ्या व्यक्तींची नावे 'शहर विद्रूपीकरण पुरस्कार' या उपहासात्मक उपक्रमातून जाहीर केली जात आहेत.

या पुरस्काराच्या यादीत भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह नगरसेवक सुनील पांडे आणि पृथ्वीराज सुतार यांची नावे झळकली होती. त्यानंतर महापौर मंजूषा नागपुरे यांच्या फ्लेक्सवरूनही महापालिकेने सोशल मीडियावर उपहासात्मक सवाल केला होता. ड्रेनेज कामासाठी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करणाऱ्या फ्लेक्सवरून प्रशासनाने महापौरांना चिमटा काढला होता. काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांच्या फ्लेक्सची दखल घेतानाही प्रशासनाने अशाच प्रकारे उपहासात्मक पोस्ट केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.