Devendra Fadnavis News: फडणवीसांचा इशारा अन् भाजप नगरसेवकांची धावपळ! 100 जणांना नोटिसा; पदवीधर, शिक्षक निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला

Pune Graduate Constituency Election: 100 BJP corporators receive show cause notices : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान वाढविण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजप नगरसेवकांना इशारा दिल्याची माहिती आहे.
Pune Graduate Constituency Election
Pune Graduate Constituency ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, आता भाजपने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

मतदार नोंदणी अपेक्षेप्रमाणे न झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली. त्यातच प्रचारसभेला दांडी मारणाऱ्या सुमारे १०० नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मतदान वाढविण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे. मतदान कमी झाल्यास त्याचे परिणाम नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यावर होऊ शकतात, या धास्तीने मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये पुण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मजबूत संघटनात्मक यंत्रणा असूनही अपेक्षित मतदार नोंदणी झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट हस्तक्षेप करावा लागला. भविष्यात पदे देताना नगरसेवकांचे 'रिपोर्ट कार्ड' तपासले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रचाराची सांगता होत असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे. मतदार नोंदणीतील उणिवा भरून काढता येणार नसल्या, तरी नोंदणीकृत मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. त्यामुळे नगरसेवकांसह बूथस्तरावरील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यात आले आहे.

Pune Graduate Constituency Election
Rahul Kanal Threat: शिवसेना नेते राहुल कनाल यांच्या जीवाला धोका? घर-ऑफिसची तीनदा रेकी; सलमान खान कनेक्शन चर्चेत

नगरसेवकांच्या कामगिरीवर वरिष्ठांचे लक्ष

पुणे महापालिकेत भाजपचे ११९ निवडून आलेले आणि सात स्वीकृत असे एकूण १२६ नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, प्रचारसभेला सुमारे १०० नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने पक्षाच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संबंधित नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या.

आता निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याची जबाबदारीही नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांना मतदानाची आठवण करून देणे आणि प्रत्यक्ष मतदानासाठी प्रवृत्त करणे, यासाठी नगरसेवकांची लगबग सुरू झाली आहे. मतदानाचा अपेक्षित टप्पा गाठण्यात अपयश आल्यास त्याची दखल पक्षश्रेष्ठींकडून घेतली जाण्याची शक्यता असल्याने नगरसेवकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.

Pune Graduate Constituency Election
Solapur Politics News: शरद पवारांचा बडा नेता समर्थकांसह भाजपमध्ये; धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का, राम सातपुतेंची ताकद वाढणार?

बूथनिहाय यंत्रणा सक्रिय

लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून बूथनिहाय संघटनात्मक यंत्रणा राबविली जाते. त्याच धर्तीवर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीतही पुण्यात ही यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. बूथस्तरावरील कार्यकर्ते आणि पन्नाप्रमुखांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे.

विशेषता नोंदणीकृत पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मतदार नोंदणीच्या टप्प्यावर अपेक्षित कामगिरी न झाल्याने आता मतदानाच्या दिवशी संघटनात्मक ताकद दाखविण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

पुणे जिल्ह्यातील मतदारांवर विशेष लक्ष

पदवीधर मतदारसंघात एकूण तीन लाख ८८ हजार १९ मतदार असून, त्यापैकी पुणे जिल्ह्यातील ८८ हजार ७० मतदार आहेत. शिक्षक मतदारसंघात एकूण ६२ हजार मतदारांपैकी पुणे जिल्ह्यातील १६ हजार ८८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी भाजपने नगरसेवकांना कामाला लावले आहे.

पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुनील मोदी निवडणूक लढवत आहेत.

शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर मैदानात आहेत. महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सानप यांच्या पाठिंब्याची घोषणा केली आहे. याशिवाय माजी आमदार दत्तात्रय सावंत हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.

या बहुरंगी लढतीत पुणे जिल्ह्यातील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात उमेदवारांच्या प्रचारासोबतच मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यावर भाजपने भर दिला आहे. आता नगरसेवकांच्या संपर्क मोहिमेचा मतदानाच्या टक्केवारीवर किती परिणाम होतो आणि पक्षश्रेष्ठींच्या अपेक्षांनुसार कामगिरी होते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant Patil
Pune MLC Election
MLC Election : पुणे शिक्षक-पदवीधर निवडणूक : अर्ज प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांनी बाह्या सरसावल्या : सर्वच पक्षांची गणितं बिघडली?
Vidhan Parishad Election 2026
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com