Diveagar Accident: दिवेआगरमध्ये 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; आळंदीतील विनर्स अकॅडमीला टाळे, पालक संतप्त, कर्मचारी कुठे?

Diveagar 8 student Drowning News: सहलीसाठी एकूण 42 विद्यार्थी आणि दोन शिक्षक दिवेआगर येथे गेले होते. दुर्घटनेनंतर तेथे उपस्थित शिक्षकांनी काही पालकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे घटनेची माहिती दिली.
Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Diveagar Beach Drawn 8 Students from Pune AlandiDiveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Published on: 
Updated on: 

आळंदी ( पुणे) : दिवेआगर येथे सहलीदरम्यान आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आळंदीतील विनर्स अकॅडमीच्या कार्यालयाबाहेर पालकांची मोठी गर्दी झाली. मात्र, आपल्या मुलांची माहिती घेण्यासाठी आणि पुढील व्यवस्था जाणून घेण्यासाठी आलेल्या पालकांना अकॅडमीकडून कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने संताप व्यक्त केला. अकॅडमीच्या प्रभाग क्रमांक चारमधील कार्यालयाला टाळे लावले आहे.

या सहलीसाठी एकूण 42 विद्यार्थी आणि दोन शिक्षक दिवेआगर येथे गेले होते. दुर्घटनेनंतर तेथे उपस्थित शिक्षकांनी काही पालकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे घटनेची माहिती दिली. मात्र, उर्वरित विद्यार्थी सध्या कुठे आहेत, त्यांना आळंदीत परत आणण्याची व्यवस्था काय आहे आणि ते कधीपर्यंत परतणार, याबाबत अकॅडमीकडून पुरेशी माहिती मिळाली नसल्याचा आरोप पालकांनी केला.

दुर्घटनेची माहिती मिळताच रात्री पालक अकॅडमीच्या कार्यालयाजवळ जमा होऊ लागले. काही जण एकमेकांना धीर देत होते, तर काही पालक आपल्या मुलाची सुरक्षितता तपासण्यासाठी धावून आले होते. अशा परिस्थितीत अकॅडमीच्या वतीने कोणीतरी पालकांशी संवाद साधणे अपेक्षित असताना कार्यालय बंद असल्याने नाराजी अधिक तीव्र झाली.

Diveagar Beach Drawn 8 Students from Pune Alandi
Pradeep Purnekar Murder: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; गोवा सीमेवरून दोन मुख्य आरोपी ताब्यात

स्थानिक कार्यकर्ते संदीप नाईकरे यांनी सांगितले की, सहलीपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले होते. मात्र, सहल आयोजित केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आणि दुर्घटनेनंतरची व्यवस्था याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण घटनेची चौकशी होण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आळंदी पोलिसांनी अकॅडमीच्या कार्यालय परिसरात बंदोबस्त ठेवला. महिला आणि पुरुष पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. पालकांची गर्दी वाढत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले.

दरम्यान, दिवेआगर येथे असलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना स्थानिक प्रशासनाकडून आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांशी संपर्क करून देण्यात आला असून, चहा, पाणी आणि नाश्त्याची व्यवस्थाही स्थानिक नागरिकांनी केली. तेथील विद्यार्थ्यांचे काही व्हिडिओ आळंदीत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

उर्वरित विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आळंदीत आणण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाकडून दिवेआगरच्या स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला जात आहे. दरम्यान, दुर्घटनेची नेमकी कारणे आणि सहलीच्या आयोजनातील जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशीची मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com