Pune News : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. एकीकडं सीसीटीव्हीत हनुमंत पवार यांच्यावर हल्ला झाल्याचं स्पष्ट दिसत असताना दुसरीकडं हा हल्ला करणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी हनुमंत पवारांवरच २६ गुन्हे दाखल असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांना हनुमंत पवार यांनी उत्तर दिलं असून दामगुडेंना थेट आव्हानही दिलं आहे.
काही दिवसांपूर्वी मालेगावच्या महापालिकेत उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानची प्रतिमा लावल्यामुळं वाद निर्माण झाला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यानंतर भाजपनं हा मुद्दा उचलून धरत काँग्रेसविरोधात मोर्चा खोलला होता. काँग्रेसनंही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं, आजवर भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवरायांबाबत अवमानकारक विधानं केलेली असताना त्यांच्यावर कारवाया का केल्या नाहीत? असे प्रश्न विचारले होते. त्यामुळं भाजप विरुद्ध काँग्रेस असा वाद चांगलाच पेटला होता. त्याचं कारण ठरलं होतं टिपू सुलतान! याच वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे हे एका वृत्तवाहिनीवरील डिबेट शोमध्ये सहभागी झाले होते. या ठिकाणी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चिडलेल्या हनुमंत पवारांनी दामगुडेंवर अपशब्दांचा वर्षाव केला होता.
दरम्यान, काल पुन्हा एकदा हे दोघे जण दुसऱ्या एका वृत्तवाहिनीवरील डिबेट शोसाठी एकाच ठिकाणी आले होते. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर हे दोघेही वृत्तवाहिनी आणि वर्तमानपत्राच्या कार्यालयाबाहेर आले असताना दमगुडेंनी आपल्या चार ते पाच सहकाऱ्यांसह हनुमंत पवार यांना मारहाण करायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळं पवार हे गोंधळून गेल्याचं सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसतं आहे. पण यावेळी त्यांच्यात जी बाचाबाची झाली त्यावेळी दामगुडेंच्या कमरेला पिस्तुल लावलेलं होतं आणि ते दाखवत दामगुडे आपल्याला धमकी दिल्याचा आरोप हनमंत पवार यांनी केला होता. यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेत दामगुडेंचं पिस्तूल जप्त करत त्यांचा परवाना रद्द केला, तसंच अशी धमकी दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. पण यानंतर दामगुडेंनी माध्यमांशी बोलताना हनमंत पवार यांच्यावर २६ गुन्हे दाखल असल्याचा दावा केला होता. तसंच आपल्यावर एकही गुन्हा नसल्याचं म्हटलं होतं.
यानंतर आता सरकारनामाशी बोलताना हनुमंत पवार यांनी दामगुडेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं असून थेट दामुगुडेंना आव्हानही दिलं. पवार म्हणाले, ते जर म्हणत असतील की 26 गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. तर मग त्यांनी याबाबतची माहिती पुराव्यानिशी द्यावी. माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाही, माझ्यावर एक आंदोलनातील गुन्हा दाखल होता आणि आणखी काही रस्त्यावरील आंदोलनातील गुन्हे दाखल असू शकतात, मला त्याबाबत माहिती नाही. शेतकऱ्यांच्या विषयावर आक्रमकपणे आंदोलन केल्याबाबत एक गुन्हा दाखल होता. त्याबाबतचा निकाल लागला असून त्याचं निकालपत्र देखील माझ्याकडं आहे. या व्यतिरिक्त माझ्यावर एकही वैयक्तिक गुन्हा दाखल नाही, असा खुलासा त्यांनी केला. तसंच दामगुडे हे मी भाजपचा सदस्य नाही असं सांगत आहेत. पण त्यांचे फोटो भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांसोबत आहेत. तसेच ते भाजपच्या नेत्यांच्या मुर्त्या देखील वाटताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासोबत जे मला मारहाण करत होते ते भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा दावा देखील यावेळी हनुमंत पवार यांनी केला.
त्याचबरोबर या गंभीर प्रकरणात पोलिसांकडून कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, दामगुडेंना पोलिसांनी केवळ दोन तासांतच सोडून दिलं, त्यामुळं यामागे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप देखील हनुमंत पवार यांनी केला आहे.