दहावी-बारावी परीक्षांबाबत अफवांवर विश्‍वास नको; एसएससी बोर्डाचे आवाहन : परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

समाज माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत येणाऱ्या बातम्या गैरसमज पसरविणाऱ्या आहेत.
sar76.jpg
sar76.jpg

पुणे : समाज माध्यमातून दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत येणाऱ्या बातम्या गैरसमज पसरविणाऱ्या आहेत. या बातम्यांवर विद्यार्थी-पालकांनी विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१ मध्ये आयोजित केलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षा या नियोजित कालावधीतच होणार आहेत,अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.


दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहेत. तसेच दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल, तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा परीक्षा ५ ते २२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. त्या अनुषंगाने परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निर्धारित कालावधीत पार पडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, विविध समाज माध्यमाद्वारे दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विविध अफवा प्रसारित होत आहेत. त्यामुळे या परीक्षेशी संबंधित घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

या संदर्भात बोलताना डॉ. भोसले म्हणाले, ‘‘ मंडळामार्फत सर्व संबंधित घटकांना ‘‘अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये’’ असे आवाहन करण्यात आले आहे. यासंदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर व प्रसिद्धी माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळामार्फत या संदर्भातील लेखी सूचना वेळोवेळी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतात. त्याच सूचना अधिकृत मानण्यात याव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एप्रिल-मे २०२१ मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत देण्यात येणार आहेत. त्याचे काटेकोर पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षांना तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.
-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com