

Pune News : राज्यात ९ जुलै रोजी झालेल्या 'शाळा बंद' आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे ८ हजार ६०० शिक्षकांवर शिक्षण विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या या सर्व शिक्षकांच्या एका दिवसाच्या वेतनात करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भूमिकेतून शासनाने आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश यापूर्वीच जारी केले होते.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत हे मुख्य आंदोलन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत शिक्षण विभागाने अखेर ही दंडात्मक कारवाई निश्चित केली आहे.
९ जुलैच्या आंदोलनापूर्वीच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की, कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद राहता कामा नयेत. तसेच, जे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी शाळा बंद ठेवतील किंवा आंदोलनात सहभागी होतील, त्यांच्या एका दिवसाच्या वेतनात कपात करण्याचे आदेशही प्रशासनाने आधीच दिले होते. मात्र, शासनाचा हा इशारा डावलून अनेक संघटना व शिक्षक या आंदोलनात उतरले.
शालेय शिक्षण विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील एकूण २४ हजार ६१३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी २२ हजार ११० शाळा नियमित सुरू होत्या, तर १ हजार ४६६ शाळा बंद राहिल्या. एकूण २ लाख ३२ हजार ९७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित होते. काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनी शाळा सुरू ठेवून, हाताला काळ्या फिती लावून आंदोलनाला प्रतीकात्मक पाठिंबा दर्शवला.
राज्यातील विविध ८ विभागीय मंडळांमधील सुमारे २ लाख ७२ हजार ०१७ शिक्षकांपैकी ८,६०० शिक्षक प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले होते. मुंबई मधून एकूण ७,४६५ ६८७ शिक्षक आंदोलनात सहभागी. पुण्यातून एकूण ३८,३७४ शिक्षकांपैकी १,०१८ शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. नाशिक मधून एकूण ४०,६४५ शिक्षकांपैकी ३० शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. कोल्हापूर मधून एकूण २२,५६० शिक्षकांपैकी ३,४१५ शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. कोल्हापूर येथील आकडा सर्वाधिक आहे.
छत्रपती संभाजीनगर येथुन एकूण ३०,७३७ शिक्षकांपैकी २३९ शिक्षक आंदोलनात सहभागी झाले.लातूर मधन एकूण २४,३५३ शिक्षकांपैकी २१७ शिक्षक आंदोलनात सहभागी झाले.अमरावती मधून एकूण २८,५४४ शिक्षकांपैकी फक्त १ शिक्षक सहभागी झाला. नागपूर मधून एकूण १२,२४२ शिक्षकांपैकी ३,०१२ शिक्षक आंदोलनात सहभागी झाले. राज्यातील एकूण २,७२,०१७ शिक्षकांपैकी ८,६०० शिक्षकांवर होणार पगारकपातीची कारवाई होणार आहे.या कारवाईमुळे राज्यातील शिक्षक संघटनांमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.