Baramati Political News : नगरमधील चौंडी येथील आंदोलनानंतर बारामतीतही धनगर समाजाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू आहे. आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णयाचे आश्वासन द्यावे आणि मुख्यमंत्र्यांनी येऊन उपोषण सोडवावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे शनिवारी नियोजित असलेल्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर आरक्षणाचा शब्द देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीला येणेच टाळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती येथे व्हाईस ऑफ मीडियाचे दोनदिवसीय राज्य अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शनिवारी होणार होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे समजले. दरम्यान, आक्रमक धनगर आंदोलक आरक्षणाबाबत जाब विचारणार असल्याचे शिंदे आणि फडणवीस यांनी बारामतीत येणे टाळल्याची चर्चा आहे.
बारामती येथे मागील दहा दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ, असे नऊ वर्षांपूर्वी दिलेला शब्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पाळला नाही, तर एसटी आरक्षणाच्या अंमलबजाणीसाठी मिळालेल्या ५० दिवसांत सरकारने भूमिका का घेतली नाही, असा प्रश्न आंदोलक उपस्थित करत आहेत. आंदोलकांच्या या तीव्र भावनांचा धसका सत्ताधाऱ्यांनी घेतल्याचाही सूर आता बारामतीमध्ये उमटू लागला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमासाठी नियोजनाप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहेत. आता हे दोन नेते तरी आंदोलकांची विचारपूस करणार का? आंदोलकांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवणार का? असाही सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मागील दहा दिवसांपासून प्रशासन व राज्य शासनातील कोणताही जबाबदार अधिकारी व राज्य शासनाचा प्रतिनिधी आंदोलनाकडे फिरकला नसल्याने धनगर समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.