पिंपरी : राज्य मंत्रीमंडळ विस्ताराप्रमाणे भाजपच्या राज्यातील जिल्हाध्यक्ष नियुक्त्याही आता रखडल्या असून त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. 'मोदी @9' या भाजपच्या देशव्यापी मोहिमेमुळे या नेमणुका रखडल्याचे कारण आता देण्यात आले आहे. दरम्यान, या नेमणुकीविषयी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठे औत्सुक्य आहे. कारण हे पद भोसरीकडेच राहणार की चिंचवडला जाणार यावर पैजा लागल्या आहेत.
भाजपची जंबो राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष १५ मे व नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. पण, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा आणि त्यासाठी तयारीच्या बैठकांचे सत्र यामुळे जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची ही डेडलाईन हुकली. नंतर मे च्या शेवटचे व नंतर जुनचे अनेक मुहूर्त दिले गेले. पण, ते ही चुकले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपने देशभर सुरु केलेल्या 'मोदी @9' या मोहिमेमुळे या नेमणुकांना आता पुन्हा ब्रेक लागला आहे. ही मोहीम ३० जूनपर्यंत चालणार आहे. जिल्हाध्यक्ष त्यापूर्वी नियुक्त केले, तर त्यांची कार्यकारिणी तयार होण्यास वेळ जाईल.
परिणामी या मोहिमेला अडथळा निर्माण होईल. त्यातून या नेमणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्याला भाजपच्या राज्य स्तरावरील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने 'सरकारनामा'शी बोलताना आज दुजोरा दिला.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष निवडीपूर्वी त्या-त्या जिल्ह्यात पक्ष निरीक्षक जाऊन तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सांगितले होते. त्यानुसार भाजपचे पिंपरी-चिंचवड निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला.
त्यांनी पक्षाचे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शहराध्यक्ष निवडीबाबतच्या भावना जाणून घेतल्या. हा आढावा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादरही केला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील आठ-दहा जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलायचे की त्यांनाच किमान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत कायम ठेवायचे, यावर भाजपमध्ये चर्चा सुरु आहे. त्यावर एकमत न झाल्याने हा निर्णय आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.