

Pune News : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे यांचे आज दुःखद निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जायचे. काल सायंकाळी जेवणानंतर ते आपल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी गेले. त्यानंतर ते सकाळी नित्य नियमाप्रमाणे सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉक साठी उठले नाहीत.
त्यामुळे कुटुंबीयांनी नऊ वाजता दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढलं व वानवडी येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र त्या ठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी कोंडवा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातील.
दरम्यान, हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव होते. 1999 ते 2002 या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले होते. विद्यार्थी संघटना आणि पुढे युवक काँग्रेसच्या चळवळीतून तयार झालेले जालिंदर कामटे हे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांचा लौकिक होता. पुणे शहरातील विद्यार्थी चळवळी तसेच पुणे विद्यापीठावरील त्यांची अनेक आंदोलने गाजली.
काँग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे ते खंदे समर्थक. त्यांच्या पत्नी जयश्री कामठे या 1992 ते 98 या कालावधीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि महिला आणि बालकांच्या समितीच्या सभापती होत्या. 1997 मध्ये जालिंदर कामटे हे जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर 1999 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 2015 ते 2018 दरम्यान ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. राजकारणासाठी हवेली तालुक्याबरोबरच पुरंदर तालुक्यातील त्यांनी आपले राजकीय कार्यक्षेत्र निर्माण केले. स्वर्गीय वसंत दादा पाटील हे त्यांच्या गुरुस्थानी होते. त्यांच्या नावाने त्यांनी कोंढवा येथे शाळा सुरू केली.
काँग्रेस पक्ष फुटून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पुणे जिल्ह्यात जालिंदर कामठे यांनी शरद पवार यांच्या बाजूची भूमिका घेतली. त्यावेळी शरद पवार यांच्या समर्थकांची पहिली बैठक जालिंदर कामटे यांच्या क्वीन्स गार्डन येथील जिल्हा परिषद अध्यक्ष बंगल्याच्या आवारामध्ये झाली.
संपूर्ण पुणे जिल्ह्याचा राजकीय आवाका असलेले जालिंदरभाऊ काही काळ भाजपमध्ये कार्यरत होते. त्यानंतर गेल्या एक -दीड वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस मधून आपले काम सुरू केले. आपले मित्र स्वर्गीय रामभाऊ बराटे यांच्या नावाने आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी पुरस्कार त्याचबरोबर समाजातील सामाजिक क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार त्यांनी सुरू केले. पुण्यामध्ये राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील मथुरा त्यानंतरचा सुभद्रा कट्टा ही गेल्या 30-40 वर्षापासूनची ओळख जालिंदर भाऊ कामठे यांनी पुणे शहर जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला मिळवून दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.