

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंना धक्का देत खासदारांच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते व विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांना फोडले. शिंदेंच्या शिवसेनेकडून अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
अहिर यांनी शिंदेंसोबत जाणे हे आमदार आदित्य ठाकरे यांच्या राजकारणासाठीही ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. त्यामुळे खरेच ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळी मतदारसंघ त्यांच्या हातून निसटेल का? या बाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. २०२४ विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंचे लीड हे 64 हजारावरून आठ हजारावर आले होते. आता अहिर यांनी देखील साथ सोडल्याने वरळी मतदारसंघ देखील सेफ नसल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत.
'सकाळ'चे मुंबईचे ब्यूरो चिफ विनोद राऊत यांनी सांगितले की, ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळी मतदारसंघात चांगले संघटन आहे. मात्र, सचिन अहिर यांची देखील वरळी मतदारसंघात ताकद आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीमध्ये अहिर यांची ठाकरेंना बरीच मदत झाली होती. मजूर मिल संघटनेचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे कामगारांची ताकद देखील त्यांच्या मागे आहे. निवडणूक लढताना ज्या संसाधनांची आवश्यकता लागते ती अहिर यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने वरळीमध्ये फरकच पडणार नाही, असे म्हणता येणार नाही. आदित्य ठाकरेंसाठी पुढील निवडणूक टफ असेल.
वरिष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितले की, वरळी हा मतदारसंघ दत्ताजी नलावडे यांनी बांधलेला मतदारसंघ आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादीमध्ये असताना 2009 मध्ये जिंकले मात्र त्यांच्या विजयात मनसेचा वाट होता. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार आशिष चेंबूरकर यांचा पराभव झाला. मात्र, 2014 ला शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदेंनी मोठ्या फरकाने अहिर यांचा पराभव केला होता.
आदित्य ठाकरे यांना पहिल्या वेळी चांगलं मताधिक्य मिळालं होतं. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा त्यांच्या मताधिक्य खूप कमी होतं. कारण त्या निवडणुकीत इतर मुद्दे महत्त्वाचे ठरले. महाविकास आघाडीचा सर्वच मतदारसंघामध्ये पिछेहाट झाली. जर, सचिन अहिर यांची खरचं मोठी ताकद असती तर आदित्य ठाकरेंचे मताधिक्य येवढे खाली आले नसते. शिवसेनेचा पारंपरिक मतदार तेथे आहे. वरळी, शिवडी, लोअर परेल हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सचिन आहेर यांच्या निमित्ताने भयगंड निर्माण करायचा तेथे प्रयत्न आहे. वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मजबूत आहे. अहिर गेल्यामुळे गेल्यामुळे तो नष्ट होईल, असे म्हणता येत नाही.
अनेक वर्ष शिवसेना कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार संजय परब यांनी देखील अहिर यांच्या जाण्याने फार फरक पडेल, असे वाटत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ठाकरेंनी सचिन अहिर यांना त्यांच्या क्षमतेपासून अधिक दिले. अरुण गवळी यांच्या गिरणी कामगार राष्ट्रीय मिल मजूर संघाचे ते पदाधिकारी होते. अरुण गवळीचा सपोर्ट आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते राजकारणात पुढे आले. अहिर हे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र, त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादीला ताकद वाढली नाही. ठाकरेंचे सुनील शिंदे हे वरळीतून आमदार होते. तेच वरळीत शिवसेनेचा मुख्य माणूस आहेत.
ठाकरेंची मुंबईत ताकद आहे. हे भाजप आणि एकनाथ शिंदेंना महापालिका निवडणुकीच्या वेळी दिसून आले. त्यांनी पूर्ण ताकद लावून देखील ठाकरेंनी 60 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे शिंदेंना मुंबईत फारशी संधी नाही, हे ओळखूनच त्यांनी अहिर यांना फोडल्याचे दिसते. त्यांच्या माध्यमातून मुंबईची ताकद वाढवण्याच्या ते प्रयत्न करत आहेत. मात्र, वरळी मतदारसंघात शिवसेनेचा मतदार आहे. तो ठाकरेंसोबत राहील.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सचिन अहिर हे उमेदवार होते. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून सुनील शिंदे होते. शिंदे यांनी अहिर यांचा तब्बल 23 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. शिंदे यांना 60 हजार 625 मतं तर अहिर यांनी 37 हजार 613 मतं मिळाली होती. 2019 मध्ये आदित्य ठाकरे या मतदारसंघातून तब्बल 64 हजारांचे मताधिक्य घेत विजयी झाले होते. तर, 2024 मध्ये त्यांचे मताधिक्य आठ हजारापर्यंत खाली आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.