राजगुरूनगर (जि. पुणे) : महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) चांगले ऋणानुबंध जुळलेले आहेत. शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चांगला संपर्क आहे. पण, भविष्यातील निवडणुका बरोबरीने लढण्याबाबत काय परिस्थिती राहील, यावर आत्ता भाष्य करणे योग्य नाही. सत्तेसाठी आम्ही कोणाबरोबरही फरफटत जाणार नाही. आत्मसन्मान राखून जे काही बेरजेचे राजकारण करावे लागेल, तो निर्णय पक्षप्रमुख घेतील आणि शिवसैनिकही त्याबाबत सहकार्य करतील, असे शिवसेनेच्या उपनेत्या, विधान परिषदेतील उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी स्पष्ट केले. (Good relations with NCP; But Uddhav Thackeray will decide the alliance : Neelam Gorhe)
खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोऱ्हे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चांगले ऋणानुबंध जुळलेले आहेत. भविष्यातील निवडणुका बरोबरीने लढण्याबाबत काय परिस्थिती राहील, याबाबत पक्षप्रमुखच योग्य तो निर्णय घेतील. मात्र, शिवसेनेच्या सगळ्या जागा कुणाला देऊन टाकणार, असे काही होणार नाही. शिवसेनेकडे अनेक सक्षम नेते, पदाधिकारी आहेत. अनेकजण शिवसेनेत येण्यासाठीही इच्छुक आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत मित्रपक्ष आणि संघटना यांना बरोबर घेऊन, त्यांच्याशी स्थानिक शिवसैनिकांचा समन्वय कसा होतो, ते पाहून निर्णय घेतला जाईल. मात्र सत्तेसाठी कोणाबरोबर आम्ही फरफटत जाणार नाही. आत्मसन्मान राखून जे काही बेरजेचे राजकारण करावे लागेल, तो निर्णय पक्षप्रमुख घेतील आणि कार्यकर्तेही त्याबाबत सहकार्य करतील.
काही तुरळक लोक जरी इकडेतिकडे गेली असतील तरी मूळ शिवसैनिक जागेवरच आहे. शिवसेना हा मोठा प्रवाह आहे, त्यात छोटीमोठी वळणे, चढउतार आले तरी प्रवाह पुन्हा सुरूच राहतो. येथे गावागावांत शाखा आहेत. तेथे काम करणारा शिवसैनिक हललेला नाही. शिरूरमध्ये पूर्वी परिवर्तन बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांतूनच झाले होते. पुन्हा शिवसेनेचाच भगवा फडकेल. काहीही मिळवायच नसणारा त्यागी निष्ठावान शिवसैनिक जोपर्यंत आहे, तोपर्यंत शिवसेनेला काही होणार नाही. त्यामुळे या मतदारसंघात काही पोकळी वगैरे आम्हाला जाणवत नाही. उलट मुक्तता अनुभवत असल्याने कार्यकर्ते उत्साहीत झाले आहेत, असा टोलाही गोऱ्हे यांनी आढळरावांचे नाव न घेता लगावला.
न्यायालयाकडून शिवसेनेला न्याय मिळेल, अशी आशा आहे. शिवसेनेच्या मेळाव्याला गर्दी जमवावी लागत नाही, ती आपोआप होते. इतरांना प्रयत्न करावे लागतात, ते करणे त्यांचे काम आहे, असेही त्या म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.