Maharashtra political news : निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय मंडळींना पुरविण्यात आलेली सुरक्षा काढण्याचा निर्णय पुणे पोलिस आयुक्तांनी घेतला होता. त्यानुसार तातडीने त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा गुरूवारी प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे. हा शपथनामा प्रकाशित करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार वंदना चव्हाण आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांना पार्थ पवार यांना राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेबाबत विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना 'आमच्या कुटुंबातील मुलाला संरक्षण दिले यासाठी गृहमंत्र्यांचे आभार,' असे मोजक्या शब्दात उत्तर देत जयंत पाटील यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ यांना वाय प्लस सुरक्षा पुरविण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पार्थ यांना ही सुरक्षा पुरविण्यामागे नक्की कारण काय, याची कोणतीही माहिती राज्य सरकारच्या वतीने अद्यापही स्पष्टपणे देण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात त्यांना ही सुरक्षा पुरविण्यात आल्याचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले. तसेच त्याची अंमलबजावणी देखील करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पोलिस आयुक्तांनी अनेकांची सुरक्षा काढून घेतली, मग पार्थ यांना ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचे कारण काय, अशी विचारणा केली जात आहे.
पार्थ पवार यांनी पाच वर्षांपूर्वी मावळ (Maval) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर ते राजकीय कार्यक्रमात फारसे अॅक्टीव्ह नव्हते. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांना महायुतीने उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी पार्थ सक्रिय झाले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, आम्ही मुलांबाबत काही बोलू इच्छित नाही, आमच्या कुटुंबातील मुलाला संरक्षण दिले यासाठी गृहमंत्र्यांचे आभार,असे उत्तर पाटील यांनी दिले.
पार्थ यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी समाचार घेतला होता. वाय प्लस नाही तर त्यांच्या मागे पुढे दोन रणगाडे दिले पाहिजेत,असा टोला रोहित पवारांनी (Rohit Pawar) लगावला होता. त्यांना झेड सुरक्षा द्यायला हवी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी सुरक्षा आहे तीच द्यायला हवी होती. सागर बंगल्यातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेत्याला सुरक्षा देतात, त्यांच्या मुलाला सुरक्षा देतात, अशी टीका देखील रोहित पवार यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.