Ahmednagar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना त्यांचे नाव न घेता नगर शहरात येऊन ललकारले. "नगर जिल्ह्याला ही कीड लागली आहे. हा आजार बरा करण्यासाठी जिल्ह्यातील पुढार्यांनी पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावे. आम्ही शिर्डीला विधानसभेचा उमेदवार तयार केला आहे. तो तिथे फिरत असून, त्याला प्रचंड डिमांड आहे", असे सांगत बाळासाहेब थोरातांनी मंत्री विखे यांना ललकारले. (Latest Marathi News)
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहर शरद पवार यांच्या उपस्थित सभा झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार, नीतेश कराळे गुरूजी आदी सभेला उपस्थित होते. खासदार राऊत यांच्याबरोबरीने आमदार थोरातांनी ही सभा गाजवली. आमदार थोरातांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा दौर्यासह नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गेल्या काही दिवसांपासूनची खदखद थोरातांनी या सभेतून व्यक्त केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार थोरात म्हणाले, "माजी आमदार नीलेश लंके यांचे त्यांच्या मतदारसंघात चांगले काम सुरू होते. कोरोना काळात त्यांनी झपाटून काम केले. त्यांच्या या कामाचे कौतुक झाले. परंतु काहींना त्रास झाला. हा त्रास कोणाला झाला हे वेगळे सांगायची गरज नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बदलले. यानंतर हे महसूलमंत्री (राधाकृष्ण विखे) झाले. महसूलमंत्री झाल्यानंतर सर्वांना त्रास देण्याचे काम सुरू झाले. संपूर्ण जिल्ह्याला त्रास देणे सुरू झाले. खोट्या केस करणे. अडचणी निर्माण करणे. काम बंद पाडणे. परवानगी शिवाय भूमिपुजन करता येणार नाही, असे आदेश काढणे. याचा त्रास प्रत्येक तालुक्याला झाला. या त्रासावर विधानसभा निवडणुकीवेळी बोलणारच आहे. सगळा खुलासा करणार आहे.
याच त्रासातून जी भट्टी पेटली त्यातून नीलेश लंके सारखा कार्यकर्ता तयार झाला. त्रास वाढवला, तितकी या कार्यकर्त्याची तलवार धारदार होत गेली". आम्हाला सर्वांना त्रास होत होता. पहिली निवडणूक यातून आम्ही लढलो. राहाता मार्केट कमिटी मध्ये घुसलो. तिथे खूप मते मिळाली. यानंतर लोकांनी गणेश कारखाना घेण्याची मागणी केली. तिथे निवडून आलो. आता कारखाना चांगला चालवला. यांनी आठ वर्षे चालवला नाही, तेवढ्या सुंदरपद्धतीने हा कारखाना आम्ही चालवतो आहे.
साईसंस्थानची कामगार संस्था निवडणुकीतून आम्ही घेतली. असे करता-करता आम्ही नगरमध्ये पोहोचलो आहे. आमचा विजय होणारच आहे. महाविकास आघाडीविषयी काही वाटत असले, तरी आमच्या 40 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येतील. नगर दक्षिणची जागा लाखोंच्या मताधिक्यांनी जिंकणार, असा विश्वास आमदार थोरात यांनी व्यक्त केला.
आमदार थोरात (Balasaheb Thorath) यांनी नगर जिल्ह्यातील पुढार्यांना पक्ष बाजूला सोडून मंत्री विखे यांचे नाव न घेता त्यांच्याविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केल. दुखणं बरे करायचे असेल, तर आॅपरेशन पूर्ण करावे लागेल. येणार्या विधानसभा निवडणुकीत शिर्डीसाठी उमेदवार तयार आहे, हे देखील थोरातांनी सांगितले. सगळ्या जिल्ह्यातील पुढार्यांना सांगतो, जिल्हा शांततेने, योग्यपद्धतीने, बंधुभावाच्या वातावरण ठेवायचे असेल, तर पहिली ही कीड काढून टाकायची जबाबदारी तुम्हा-आम्हाला घ्यावी लागेल. विरोधक असतील, परंतु एकत्र यावे लागेल.
पक्ष कोणताही असू. पहिला आजार बरा झाला पाहिजे. याच्यासाठी काम करायचे आहे. शिर्डीचा उमेदवार तयार केला आहे. फिरतो आहे. त्या उमेदवाराला शिर्डीत प्रचंड डिमांड आहे. उमेदवार आम्ही जिंकून दाखवणार आहे. नगर जिल्ह्याला जो आजार लागला आहे, तो पूर्णपणे बरा केल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून आमदार थोरातांनी नगरमधील या प्रचार सभेतून मंत्री विखे यांना ललकारले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.