Pune News : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीमध्ये दाखल झाल्यानंतर ते बारामती लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. या बैठकीला राज्यभरातील आमदार, खासदार उपस्थित राहिले असून, पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) हे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी आलेल्या सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुनील तटकरे म्हणाले, आज राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बैठक आहे. या बैठकीला आमदार-खासदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीसाठी पक्षाचे निरीक्षक त्या-त्या ठिकाणी नेमले जाणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महादेव जानकर (Mahadev Jankar) हे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याबाबतच्या चर्चांवर तटकरे म्हणाले, आमच्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत...ज्यांना सुनेत्रा वहिनी (Sunetra Pawar) उमेदवार असल्याने भय वाटत आहे. अशीच मंडळी अपप्रचार करत आहेत.
जानकर महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यांना लोकसभेची एक जागा देण्याबाबत निर्णय झाला आहे. जानकरांना कुठला लोकसभा मतदारसंघ द्यायचा, याची घोषणा दोन दिवसांत होईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारीबाबत आज चर्चा होणार असून, उमेदवारांची घोषणा कधी करायची याबाबतदेखील या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीच्या चर्चांवर बोलताना तटकरे म्हणाले, राजकारणात सर्व शक्यता असू शकतात. जागावाटप आणि अदलाबदलीबाबतचा निर्णय महायुतीच्या घटक पक्षातील नेते आपसांतील चर्चांच्या माध्यमातून घेतील. छगन भुजबळ हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. अनेक निवडणुका लढल्या आहेत. अशावेळी लोकसभा निवडणुकीबाबत सहकाऱ्यांशी ते चर्चा करीत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या निवडणूक लढण्याबाबत महायुतीचे नेते लवकरच निर्णय घेतील, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.