गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक चर्चेत आहेत, तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी 'आम्ही शिरूरला दिलेला उमेदवार निवडून आणणार म्हणजे आणणार', असं विधान केलं होतं. यानंतर अजितदादांचे या मतदारसंघात दौरेही वाढले आहेत. (Marathi News)
अशातच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी शनिवारी (ता.2 मार्च) एका गाडीने प्रवास करत तब्बल सव्वा तास चर्चा केली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती बाहेर येऊ शकली नाही. यानंतर आज (ता.4 मार्च) उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे लोकसभेची निवडणूक आढळराव पाटील घड्याळाच्या चिन्हावर लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे (Ajit Pawar) सोमवारी (ता. 4 मार्च) दुपारी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन झाले. या वेळी त्यांचे जंगी स्वागत मंत्री दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा यांच्यासह माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. यानंतर मात्र, वळसे पाटील, अजित पवार व आढळराव पाटील हे एकाच गाडीत बसून वळसे पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथे काही वेळ चर्चा केली, पण या ठिकाणी फक्त प्रमुखांनाच परवानगी असल्याने चर्चेचा तपशील समजू शकला नाही. तरी आढळराव पाटील यांच्या शिरूरमधील संभाव्य उमेदवारीबाबत चर्चा झाली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच अजितदादांनी आढळराव पाटलांना 'शब्द' दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आढळराव पाटील आता हातात 'घड्याळ' बांधणार का ? याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.
2004 पासून आढळराव पाटील आणि वळसे पाटील यांच्यात कमालीचा टोकाचा राजकीय संघर्ष झाल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आणि वळसे पाटील सहकारमंत्री झाल्यापासून आढळराव पाटील आणि वळसे पाटील यांचे चांगलेच सूत जमल्याचे दिसून येत आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आढळराव पाटील हे वळसे पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीशी जवळीक साधू पाहत असल्याचे चित्र आहे. घोडेगाव व पुन्हा मंचर असा दोन ते अडीच तासांचा प्रवास आणि तीन नेत्यांची एकत्र चर्चा, त्यामुळे आढळराव पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जातील, अशी चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघात जोर धरत आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.