लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) तारखा जाहीर झाल्याने आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार काम सुरू केले आहे. जागावाटप तसेच पक्षाचे उमेदवारांचे नाव घोषित करण्यासाठी मित्रपक्षांच्या माध्यमातून बैठका घेणे सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता येणारी लोकसभा निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून ( Baramati Lok Sabha Constituency ) नक्की कोण उमेदवार उभा राहिला आणि कोणाचा विजय होईल, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तसेच, संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. बारामतीपाठोपाठ आता पुणे लोकसभा मतदारसंघदेखील चांगल्या चर्चेत आला आहे. या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असून, गेल्या आठवड्यात मनसेला सोडचिठ्ठी देऊन बाहेर पडलेले मनसेचे फायर ब्रँड नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान
आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी मोरे यांनी केली आहे. मात्र, ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार की अपक्ष उभे राहणार, याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत लोकसभेचे मतदान होणार असून, पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे, तर मावळ, पुणे शहर या लोकसभा मतदारसंघांची निवडणूक 13 मे रोजी होणार आहे.
"माझी वेळ नक्की चुकलेली नाही"
पुणे लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी मोरे यांनी केली आहे. काँग्रेससह शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मोरे ( Vasant More ) यांनी भेट घेत उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणूक कोणाकडून लढायची हे अद्यापही निश्चित झाले नाही. तरी "ज्या दिवशी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरेल तेव्हाच निवडणूक खऱ्या अर्थाने रंगतदार होईल," असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे. "माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही. मी वेळ घेतोय. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन. ही निवडणूक एकतर्फी झालेली पुणेकरांना पाहायला मिळेल," असं मोरेंनी म्हटलं.
"माझ्या तिन्ही टर्म भाजपविरोधात"
'वसंत मोरे उमेदवार असले तरी काहीही फरक पडणार नाही,' अशी टीका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी केली होती. याचा समाचारही मोरेंनी घेतला आहे. "माझ्या उमेदवारीने काय फरक पडेल, हे पुणेकर भाजपला नक्कीच दाखवून देतील. भाजपला तसेच चंद्रकांत पाटील यांना फरक पडला नसता, तर 2022 मॅरिएट हॉटेलमध्ये एक पुरस्कार मला देण्यात आला होता. त्यावेळी तर उघडपणे चंद्रकांतदादांनी सांगितले होते की, 'तुम्ही भाजपत या, तुम्ही निवडून याल.' मात्र मी तेव्हाच त्यांना म्हटलं, माझ्या तिन्ही टर्म भाजपविरोधात झाल्या आहेत आणि तिन्ही वेळा मी यशस्वी झालो आहे. मी निवडणुकीला उभे राहिल्यावर काय होईल, याची कल्पना पाटील यांना आहे. त्यामुळेच असं वक्तव्य करत आहेत," असं मोरेंनी सांगितलं.
"पुण्याचे हित झाले पाहिजे"
"निवडणुका केवळ लढायच्या नाहीत, तर जिंकायच्याही आहेत. जिंकण्यासाठी लढायचे असेल तर योग्य ट्रॅकवर असणे गरजेचे आहे. मी सध्या योग्य ट्रॅकवरच असून, त्यात यशस्वी होईन. पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात आम्ही लोकांकडून मत जाणून घेत आहोत. अनेकजण काही पर्याय सुचवतात. पण, हे पर्याय निवडताना पुण्याचे हित झाले पाहिजे, त्यादृष्टीने पावले टाकत आहे," असं मोरे म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.