Pimpri News : लोकसभेला मावळमध्ये विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीलाच नाही, तर हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यास महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीने कडाडून विरोध केला होता. त्यामुळे तिकिट मिळताच बारणेंनी मित्रपक्षांतील उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छूकांच्या गाठीभेटी घेण्यास लगेच सुरवात केली.तरीही भाजप कार्यकर्त्यांतील नाराजी कायम असल्याचे रविवारी दिसून आले.
आपल्याला विश्वासात घेतले जात नाही, तोपर्यंत बारणेंचे काम करणार नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या बुथप्रमुख, वॉरियर्स, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रविवारी देण्यात आला. त्यातून बारणेंची वाट अजून निर्धोक झाली नसल्याचे दिसले. शहर भाजपच्या आढावा बैठकीत हे नाराजीनाट्य घडले. त्यात काहींनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. मात्र,हे बंडही ही मावळ भाजयुमो आणि शिवसेनेचे विजय शिवतारे यांच्या बंडासारखेच पेल्यातील वादळ ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. (Lok Sabha Election 2024 News )
मागील दोन टर्म भाजपच्या जीवावर खासदार झालेल्या बारणेंनी दहा वर्षात पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कोणतीही विचारणा वा मदतही केली नाही, विश्वासात देखील घेतले नाही, अशा उमेदवाराला आम्ही मदत का करावी ? असा सवाल या बैठकीत पक्षाचे मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते, वॉरियर्स यांनी विचारला. कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जात नाही, तो पर्यंत निवडणुकीत काम न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बारणे उमेदवारच नकोत,असाच सूर कार्यकर्त्यांचा होता.
कार्यकर्त्यांचा संतप्त भावना वरिष्ठांपर्यंत पोचविणार असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेले भाजपचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांनी सरकारनामाला सांगितले. प्रदेश पदाधिकाऱ्यांनी हा विषय गंभीरतेने घेऊन सर्व कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा, अशी अपेक्षा दुसरे सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी यावर व्यक्त केली. त्यांच्यासह प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार हिंगे तसेच संकेत चौंधे आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान,साखरपेरणीच्या दुसऱ्या दिवशी बारणेंनी (Shrirang Barne) मावळमधून महायुतीचे लोकसभेचे इच्छूक आणि माजी राज्यमंत्री भाजपचे बाळा भेगडे (Bala Bhegde),त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकें (Sunil Shelke) त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोघांनीही मावळ तालुक्यातून विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही दिल्याचे बारणेंनी नंतर सांगितले.
भाजपमुळे यापूर्वी दोनदा चांगल्या मतांनी विजयी झाल्याचे सांगत यावेळीही त्यांचे तसेच सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे लोकसभेत काही काळ विरोधात बसावे लागले, मात्र त्या काळात आपण कधीच भाजपच्या विरोधात बोललो नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.
(Edited By : Sachin Waghmare)