Madha Lok Sabha BJP Candidate : शरद पवारांशी निकटचे संबंध दूर सारून २०१९ च्या लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये दाखल झालेल्या अकलूजच्या मोहिते-पाटलांना भाजपने आता झटका दिला. माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे धैर्यशील मोहिते-पाटलांनी नुकतेच जाहीरपणे सांगितले होते. त्यांची ही इच्छा धुडकावून लावत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माढा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी मिळू शकते, असे संकेत दिले.
लोकसभा २०१९ ची निवडणूक विजयसिंह मोहिते-पाटलांनी लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा होता. मात्र, पुत्र रणजितसिंह मोहिते पाटलांनाच उमेदवारी द्यावी, यासाठी विजयसिंह अडून बसले होते. स्वतः रणजितसिंह हेही माढ्यातून लढण्यासाठी इच्छुक होते. याला कंटाळून शरद पवारांनी त्यांचा कॉल रिसिव्ह करणे बंद केले होते.
यातून मार्ग निघत नसल्याने रणजितसिंह यांनी पक्षाच्या बैठकीतून काढता पाय घेऊन तडक देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यांचा भाजप प्रवेश विनोद तावडे, गिरीश महाजन यांनी घडवून आणल्याचे भाजप नेते सांगतात. अकलूजचा हा सिंह (रणजितसिंह मोहिते पाटील) हा हल्ला करणारा सिंह नसून गुहेत बसून केवळ डरकाळ्या फोडणारा सिंह आहे, याची जाणीव शरद पवारांना होती. फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनाही याची कल्पना आल्याचे बोलले जाते.
अजित पवार गटाला शह
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने अजित पवार गटालाही इशारा दिला आहे. फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या अजित पवार गटात आहेत. रणजितसिंह आणि रामराजे यांच्यात राजकीय कलगीतुरा सुरू असतो. रणजितसिंहांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे रामराजे यांना आता नमते घ्यावे लागू शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची बोलती बंद केल्याची चर्चा आहे.
रणजितसिंह मेहिते-पाटलांनी आपले संघटन कौशल्य सिद्ध केले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून २०१४च्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले होते. मोदी लाटेतही मोहिते-पाटलांनी लक्षणीय विजय मिळवला होता. या निवडणुकीत सर्व सूत्रे रणजितसिंह मोहितेंनी फिरवली होती. त्यावेळी त्यांचे संघटन कौशल्य दिसून आले होते. धैर्यशील मोहिते-पाटलांकडेही संघटन कौशल्य आहे. धैर्यशील ग्रामीण भागात लोकप्रिय आहेत.
नेतृत्व आम्हीच करणार, यातून मोहिते-पाटील आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात वाद निर्माण झाला आणि मतभेद वरचेवर वाढीस लागत होते. त्यातच मध्यंतरी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असल्याची घोषणा केली. यामुळे पक्षाबद्दल मतदारसंघात चुकीचा संदेश गेला होता. लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. ती थांबवण्यासाठी पाऊल उचलणे भाजपसाठी गरजेचे होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे ६ डिसेंबरला सोलापूर दौऱ्यावर होते. परत जाताना पुणे येथे पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी निंबाळकर हेच माढा लोकसभेचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रणजितसिंह मोहिते पाटलांना २०१९ मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून लढायची इच्छा होती. या वेळीही तशी त्यांची इच्छा असेल तर त्यांनी स्वतः मागणी करायला हवी होती. याऐवजी त्यांनी धैर्यशील मोहिते-पाटलांना समोर केले. सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार मोहिते-पाटील यांच्यासोबत नाहीत.
भाजपने ही संधी साधत मोहिते-पाटलांची कोंडी केली आहे. असे असले तरी मोहिते-पाटलांना डावलणे भाजपच्या अंगलट येऊ शकते. समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती मोहिते-पाटील कुटुंबीयांकडून केली जात नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश मतदारांसह धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचा अद्यापही मोहिते-पाटलांवर विश्वास आहे.
हा 'सिंह' नुसत्या डरकाळ्याच फोडत नाही, तर हल्लाही करू शकतो, हे ते दाखवून देण्याची संधी रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उपलब्ध झाली आहे. तेही संधी साधणार का? याकडे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
निंबाळकरांचे तोंडभरून कौतुक!
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गेल्या पाच वर्षांत माढा लोकसभा मतदारसंघात प्रचंड विकासकामे केली आहेत. गेल्या ५० वर्षांत कोणत्याही खासदाराने इतकी कामे केली नाहीत. जलसिंचनापासून रस्त्यापर्यंत उत्कृष्ट कामे करणाऱ्या देशातील पहिल्या ५० खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे. पक्षाने निंबाळकरांना उमेदवारी दिली तर त्यांनी केलेली विकासकामे आणि पक्षसंघटनेच्या बळावर ते माढा मतदारसंघातून ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.