

Pune News : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जिल्हा स्तरावर विषयनिहाय शिक्षकांच्या 'विषय समित्या' स्थापन करण्याचा आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिला आहे.
शिक्षण आयुक्तांनी ८ जुलै २०२६ रोजी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अद्याप अशा समित्या स्थापन झालेल्या नाहीत, तेथे त्या तात्काळ स्थापन करण्याचे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
'परख' सर्व्हेक्षणानुसार इयत्ता सहावी आणि नववीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विषय समित्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. स्थापन करण्यात आलेल्या सर्व विषय समित्यांचा अहवाल संबंधित कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कामात तत्परता आणि सुसूत्रता यावी यासाठी प्रत्येक विषय समितीचा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाणार आहे. या ग्रुपमध्ये संबंधित अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि विषय समितीचे सदस्य सहभागी असतील. जिल्हास्तरासोबतच राज्यस्तरीय व्हॉट्सॲप ग्रुपही तयार केला जाणार असून, यात प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयातील उत्कृष्ट, निवडक आणि नवोपक्रमशील पाच शिक्षकांचा समावेश केला जाईल.
या समित्यांमध्ये कृतिशील, नवोपक्रमशील आणि समर्पित शिक्षकांचा समावेश करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या विषय समित्यांमार्फत विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे, अध्ययनस्तर चाचण्यांचे नियोजन करणे, अध्यापन साहित्य व शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी या समित्यांवर असणार आहे.
माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांच्या समित्या स्थापन केल्या जातील. तर उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इतिहास, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, अर्थशास्त्र तसेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयांच्या समित्या स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी आणि शिक्षकांना तंत्रज्ञानाची जोड देऊन थेट जोडण्यासाठी शिक्षण संचालकांचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.